ठाणेतील ९०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालय प्रकल्पाला गती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘फास्टट्रॅक’ पूर्णत्वाचे निर्देश!
आरोग्य ताज्या बातम्या पायाभूत सुविधा महाराष्ट्र विकास

ठाणेतील ९०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालय प्रकल्पाला गती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘फास्टट्रॅक’ पूर्णत्वाचे निर्देश!

Jul 29, 2026

ठाणे, २८ : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या ९०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. प्रकल्पातील सर्व कामे निश्चित कालावधीत आणि ‘फास्टट्रॅक’ पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.

उपमुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, मंत्री दादाजी भूसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, संजय राठोड आणि प्रताप सरनाईक उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनीही बैठकीत सहभाग घेतला.

बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासकीय स्तरावरील कोणताही विलंब सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत प्रत्येक टप्प्यातील कामांना अधिक गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असून वीज जोडणीअभावी सेवा सुरू होण्यास विलंब होत असल्याची बाब बैठकीत समोर आली. यावर आवश्यक वीज जोडणीची कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले. त्याचबरोबर रुग्णालयाची उच्च दर्जाची स्वच्छता, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची त्वरित खरेदी तसेच शासनाने मंजूर केलेली १०७८ नवीन पदे वेळेत भरण्याची प्रक्रियाही गतीमान करण्याचे निर्देश देण्यात आले.

या ९०० खाटांच्या भव्य आरोग्य संकुलामध्ये ५०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय, २०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय आणि २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय कार्यरत राहणार आहे. कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी आणि ऑनकोलॉजीसारख्या सुपरस्पेशालिटी सेवा, १६ अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष तसेच आपत्कालीन सेवांसाठी हेलीपॅड आणि एअर अ‍ॅम्बुलन्सची सुविधाही येथे उपलब्ध असणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाखो नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच अत्याधुनिक आणि सर्वसमावेशक वैद्यकीय उपचार उपलब्ध होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *