Sanjay kelkar: गणेश विसर्जन घाट सुसज्ज होणार..आमदार संजय केळकर यांची अधिकाऱ्यांसोबत पाहणी!
आगामी काळ हा सणावारांचा असून नागरिकांची सुरक्षा आणि सुविधा या दृष्टीने ठाण्यातील विसर्जन घाट सुसज्ज आणि सुशोभित करण्याबाबत निर्णय झाला असून याबाबत महापालिका, मेरीटाईम बोर्ड वाहतूक विभाग आदी विभागांच्या अधिकाऱ्यांशी दौऱ्यात चर्चा झाल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
आमदार संजय केळकर यांनी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कोलशेत, बाळकुम-कशेळी व बाळकुम पाडा नंबर 3, साकेत, महागिरी येथील विसर्जन घाटांची पाहणी केली. यावेळी ठाणे महापालिका, मेरीटाईम बोर्ड, पोलीस अधिकारी, वाहतूक विभाग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकवस्ती वाढत असल्याने पुढील काळात गणेशोत्सवाचे प्रमाणही वाढणार आहे. त्यादृष्टीने शहरातील विसर्जन घाटही सुसज्ज आणि सुशोभित करण्याची गरज आहे. नागरिकांना सुरक्षा आणि सुविधा मिळणे आवश्यक आहे. घाटाचे सुशोभीकरण, वाहनतळाची व्यवस्था याचबरोबर इतर घाटही सुसज्ज करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा होऊन निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री.केळकर यांनी माध्यमांना दिली.
कोलशेत विसर्जन घाट येथे बांबूचे बॅरिकेट लावण्यात यावेत, पार्किंग परिसराच्या ठिकाणी तात्पुरत्या एलईडी पोलची व्यवस्था करणे तसेच जेटीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सर्व लोखंडी मटेरियल तातडीने हलविण्याचे आदेश आमदार केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. लोढा अमारा चौक ते कोलशेत विसर्जन घाटापर्यंत रस्त्यावर दिव्यांची व्यवस्था करण्यात यावी, डी मार्ट ते कोलशेत विसर्जन घाटापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या हातगाडी-टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
बाळकुम कशेळी घाट येथे आमदार निधीतून व मेरीटाईम बोर्डाच्या सहकार्याने भव्य लोखंडी शेड बांधण्यात येणार आहे तसेच सध्या एकेरी रस्ता असल्यामुळे नागरिकांना व वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. त्या ठिकाणी मेट्रो पिलरच्या बाजूला नव्याने रस्ता तयार करण्याचे तसेच वाहनतळ आणि दिव्यांच्या व्यवस्थेसह परिसर स्वच्छता करण्याचे आदेशही श्री.केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
बाळकुम पाडा 3 येथील विसर्जन घाट परिसरात देखील आमदार संजय केळकर यांच्या निधीतून आणि मेरीटाईम बोर्डाच्या सहकार्याने भव्य लोखंडी शेड बांधण्यात येणार आहे. विसर्जन घाट परिसरात बांबूचे बॅरिकेट बांधून प्रकाश व्यवस्था करण्यात यावी असे आदेश यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
पाहणी दौऱ्यात नगरसेवक विकास पाटील, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता श्री. कुसुरकर, स्वच्छता निरीक्षक श्री. कांबळे, विद्युत विभागाचे अभियंता आशिष गुप्ते, कापुरबावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी मंजुषा भोंगळे, माजिवडा वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री. सोंडे, बाळकुम अग्निशमन विभागाचे संबंधित अधिकारी तसेच भाजपचे पदाधिकारी संजय पाटील, मंडळ अध्यक्ष निलेश पाटील, जितेंद्र मढवी, सुरज दळवी, हरेश्वर पूर्णेकर, मेघनाथ घरत, भानुदास भोईर, समीर भोईर, मनीष पाटील, अल्केश कदम, रविराज रेड्डी, जमीर सिद्दिकी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते!
