मुंब्रा व दिवा परिसरात अनधिकृत पाणी जोडण्यांविरुद्ध ठाणे महापालिकेची विशेष मोहिम!
ठाणे (30) : ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मुंब्रा व दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत पाणी जोडण्यांविरोधात आजपासून (30 जुलै) तीन दिवस विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व्हिस स्टेशन, व्यावसायिक वापर, खासगी टँकर भरण्यासाठी घेण्यात आलेली अनधिकृत पाणी जोडणी तसेच घरगुती अनधिकृत जोडण्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून यासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिवा प्रभाग समिती क्षेत्रात कल्याणफाटा ते वाय जंक्शन परिसरातील अनधिकृत व्यावसायिक, सर्व्हिस स्टेशन व खासगी टँकरसाठीच्या पाणी जोडण्यांवर तर मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात वाय जंक्शन ते मुंब्रा फायर स्टेशनपर्यंतच्या परिसरातील अनधिकृत जोडण्यांवर कारवाई करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली आहे.
या मोहिमेदरम्यान अनधिकृत पाणी जोडणी खंडित करण्यात आल्यानंतर संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, खंडित करण्यात आलेली जोडणी पुन्हा सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
तीन महिन्यात 65 अनधिकृत नळ संयोजनांवर कारवाई….
ठाणे महानगरपालिकेच्या दिवा – मुंब्रा पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीचोरी रोखण्यासाठी आणि नागरिकांना नियमानुसार व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मे, जून आणि जुलै 2026 या तीन महिन्यांच्या कालावधीत मुंब्रा दिवा परिसरातील विविध भागांमध्ये तपासणी करून एकूण 65 अनधिकृत नळ संयोजनांवर कारवाई करण्यात आली असून संबंधित ठिकाणांचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला आहे.
मे महिन्यात गणेश नगर, सोनेतळा नगर, आगासन गाव, लालानी नाका तसेच कोसा गाव परिसरात कारवाई करण्यात आली. या कालावधीत 21 अनधिकृत नळ संयोजन खंडित करण्यात आले. याशिवाय जलवाहिन्यांवर बसविण्यात आलेले 40 ओव्हरव्हॉल्व्ह नळ देखील काढून टाकण्यात आले. जून महिन्यात महालक्ष्मी नगर, शिळफाटा, सद्गुरू नगर, लालानी नाका, गुलाब पार्क आदी भागांमध्ये मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान 20 अनधिकृत नळ संयोजन खंडित करून संबंधित ठिकाणांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जुलै महिन्यात कोसा गाव, शिवाजी नगर, बडेकर मळा, दिवा पूर्व तसेच इतर परिसरांमध्ये विशेष तपासणी करण्यात आली. या मोहिमेत 24 अनधिकृत नळ संयोजन शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे जलवाहिन्यांवरील अनधिकृत जोडण्या कमी होण्यास मदत होत असून, पाणीगळती व पाणीचोरीवर नियंत्रण मिळविण्यासही मदत होत आहे. त्यामुळे अधिकृत ग्राहकांना नियमानुसार पाणीपुरवठा करणे अधिक प्रभावी होत असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
ठाणे महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना अधिकृत प्रक्रियेद्वारेच नळ जोडणी घेण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत नळ जोडण्या करून पाणीचोरी करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असून, अशा प्रकारची माहिती नागरिकांनी महापालिकेला कळवावी, असे आवाहन उपनगरअभियंता, पाणीपुरवठा यांनी केले आहे!
