Delhi: दिल्ली विधानसभेत भाजप आणि ‘आप’ आमदारांमध्ये राडा; ५ आमदार सभागृहाबाहेर, कामकाज तहकूब!
दिल्ली : ०७ दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात भाजप आणि आम आदमी पार्टीच्या आमदारांमध्ये अभूतपूर्व गोंधळ आणि तुफान राडा पाहायला मिळाला. अधिवेशनादरम्यान ‘आप’चे आमदार कुलदीप कुमार आणि भाजप आमदार रवि नेगी हे दोघे आपापल्या जागेवरून उठून समोरासमोर आले. दोघांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली आणि ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. परिस्थिती थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्यामुळे सभागृहात तीव्र तणाव निर्माण झाला होता, मात्र दोन्ही बाजूंच्या इतर आमदारांनी मध्यस्थी करत दोघांना वेगळे केले.या वादाची ठिणगी बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा यांच्या विधानामुळे पडली.
विरोधी पक्षनेत्या आतिशी अधिवेशन सोडून गोव्याला फिरायला गेल्या आहेत, अशी टीका प्रवेश वर्मा यांनी केली होती. या विधानानंतर सभागृहातील वातावरण अधिकच तापले. सभागृहातील हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि असंसदीय असल्याचे सांगत सभापती विजेंद्र गुप्ता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अपशब्द आणि असंसदीय वर्तन अजिबात सहन केले जाणार नाही असा इशारा देत त्यांनी शिस्तभंगाच्या कारवाईची ताकीद दिली.सततच्या गोंधळामुळे सभापती विजेंद्र गुप्ता यांनी ‘आप’च्या संजीव झा, कुलदीप कुमार, विशेष रवी, जरनैल सिंग आणि सोमदत्त या ५ आमदारांना मार्शलमार्फत सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले.
या अभूतपूर्व गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज अखेर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.सभागृहाबाहेर आल्यानंतरही ‘आप’ आमदारांचे आंदोलन सुरूच होते. त्यांनी गळ्यात ORS च्या पाकिटांची माळ घालून अनोखा निषेध नोंदवला आणि दिल्लीतील ६५० कोटी रुपयांच्या कथित मेडिकल घोटाळ्यावरून सरकारविरोधात जोरदार निर्णय घोषणाबाजी केली. दरम्यान, हे पावसाळी अधिवेशन ११ ऑगस्टपर्यंत चालणार असून यादरम्यान सरकार ३ विधेयके मांडणार आहे तसेच CAG चे ३ अहवाल सभागृहात सादर केले जाणार आहेत!
