Thane: स्टेशन परिसरात उर्मट रिक्षाचालकांना वठणीवर आणणार..आमदार संजय केळकर यांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्तांशी चर्चा!
ठाणे न्यूज

Thane: स्टेशन परिसरात उर्मट रिक्षाचालकांना वठणीवर आणणार..आमदार संजय केळकर यांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्तांशी चर्चा!

Aug 10, 2026

ठाणे: स्टेशन परिसरातून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असून तेथील उर्मट रिक्षाचालकांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्वाच्या सूचना केल्या तसेच बुधवारी या परिसराची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित ११९व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून रोज नऊ लाख प्रवासी प्रवास करत असून त्यांना काही बेशिस्त रिक्षाचालकांचा त्रास नाहक सोसावा लागतो. हे रिक्षाचालक उर्मटपणा करतात शिवाय अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत. याबाबत नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी तक्रारी केल्या असून बुधवारी अधिकाऱ्यांसोबत येथील पाहणी करणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले. येथे इमर्जन्सी वाहनांकरिता सुरू केलेल्या मार्गिकेमध्ये इतरही रिक्षाचालकही घुसखोरी करतात, त्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ही मार्गिका बंद करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.

वागळे इस्टेटमध्ये अमली पदार्थांचे सेवन कॉलेज विद्यार्थी असल्याचा प्रकार उघडकीस आला असून तेथील नगरसेवक अमित सरय्या आणि सुरेश कांबळे यांनी निवेदन दिले. याबाबत बोलताना श्री. केळकर यांनी संताप व्यक्त केला. शाळा-कॉलेजच्या आवारात जर अमली पदार्थ मिळत असतील आणि अधिकारी कारवाई करत नसतील तर ती चिंतेची बाब आहे. सह आयुक्तांशी याबाबत बोलणे झाले असून कारवाई होणार नसेल तर भाजपला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा श्री. केळकर यांनी दिला. गेली चार वर्षे हुक्का पार्लर चळवळ राबवत असून आता ड्रग्ज विरोधात देखील नागरिकांना बरोबर घेऊन चळवळ सुरू करणार असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.

महात्मा फुले मार्केटच्या मागे मोकळ्या जागेत १०हजार चौरस फुटाच्या जागेत अतिक्रमण झाले असून अधिकाऱ्यांना तत्काळ पाहणी करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.यावेळी माजी उपमहापौर अशोक भोईर, नगरसेवक अमित सरय्या, सुरेश कांबळे, नगरसेविका नम्रता कोळी, जयेंद्र कोळी, विशाल वाघ आदी उपस्थित होते.

रायगडावरील उद्ध्वस्त नंदीची पुन्हा स्थापना होणार

रायगड किल्ल्यावर जगदीश्वराच्या मंदिरासमोर असलेल्या नंदीचे शिल्प मुघलांनी उद्ध्वस्त केले आहे. त्याची पुन्हा प्रतिष्ठापना व्हावी यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी आंदोलन केले. केंद्रीय पुरातत्व विभागाने हे शिल्प पूर्ववत केले नाही तर सह्याद्री प्रतिष्ठान हे काम विभागाच्या परवानगीने पूर्ण करेल, असा इशारा दिला. तर येत्या चार महिन्यांत उद्ध्वस्त नंदीची डागडुजी करून त्याची प्रतिष्ठापना करणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे या लढ्याला यश आल्याचे सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *