Thane: हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ठाणे मनपा शाळांमध्ये विविध देशभक्तीपर उपक्रम!
ठाणे (15) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रॅली, चित्रकला, रांगोळी आणि निबंध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान व देशप्रेम उत्स्फूर्तपणे व्यक्त केले. शाळा क्रमांक 53, पातलीपाडा येथे इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ रॅलीमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ आणि ‘हर घर तिरंगा’ अशा घोषणा देत परिसरातून रॅली काढली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. तसेच विद्यार्थ्यांसाठी रांगोळी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी तिरंगा, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनांवर आधारित आकर्षक रांगोळ्या साकारल्या. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रांगोळ्यांची पाहणी करून स्थानिक नगरसेविका कमल चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले.
ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 79 दिवा येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत निबंध, रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या कलागुणांना व लेखनकौशल्याला वाव दिला. राष्ट्रध्वज, स्वातंत्र्यदिन आणि देशभक्तीपर विषयांवर विद्यार्थ्यांनी विविधांगी कलाकृती सादर केल्या. शाळा क्रमांक 97, गायमुख येथेही ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्ती, राष्ट्रध्वज, स्वातंत्र्यदिन आणि ‘हर घर तिरंगा’ या संकल्पनांवर आधारित सुंदर व आकर्षक चित्रे साकारली. शाळा क्रमांक 88 येथे रांगोळी व चित्रकला उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध रंगांचा वापर करून तिरंगा व राष्ट्रभक्तीपर संदेशांवर आधारित कलाकृती साकारत अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळा क्रमांक 131 येथील विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत रॅली काढली. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या सहभागातून राष्ट्रध्वजाबद्दल आदर, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रध्वजाबद्दल आदर, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सहभागाची भावना दृढ होण्यास मदत झाली. विविध शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना विद्यार्थ्यांसह शिक्षक व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अधिक वृद्धिंगत झाला असून, प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकविण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी जनमानसापर्यंत पोहोचविला.
