Boriwali : मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती करणाऱ्या २० हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव…‘जन्मभूमी कुठलीही असो, कर्मभूमी महाराष्ट्र आहे; मराठी भाषा जोडणारी आहे’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे….बोरिवलीत मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वितरण!
ताज्या बातम्या

Boriwali : मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती करणाऱ्या २० हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव…‘जन्मभूमी कुठलीही असो, कर्मभूमी महाराष्ट्र आहे; मराठी भाषा जोडणारी आहे’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे….बोरिवलीत मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वितरण!

Aug 27, 2026

मुंबई, ता. २६ : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य राज्य असले तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर प्रेम करा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बोरिवली येथील कोरा केंद्र ग्राउंडवर २० हजार हिंदी भाषिक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षणाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.रस्त्यावर येताना मराठी शिकलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांची मोठी गर्दी पाहून आनंद झाल्याचे सांगत शिंदे यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी साहित्यिक, भाषातज्ज्ञ, प्राचार्य, शिक्षक आणि मराठीप्रेमींना सोबत घेऊन कठीण काम सोपे केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

“मराठी भाषा तोडणारी नाही, जोडणारी आहे. रिक्षा-टॅक्सीमध्ये प्रवाशाला ‘कुठे जायचे?’ एवढेच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकाला ‘हळू उतरा’ असे प्रेमाने म्हणता आले पाहिजे. प्रवाशांनीही चालकांशी मराठीत संवाद साधावा. त्यामुळे मराठीचा प्रचार-प्रसार वाढेल आणि चालकांचा व्यवसायही वाढेल,” असे शिंदे म्हणाले.आपणही सुरुवातीच्या काळात रिक्षा चालवली असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी रिक्षा-टॅक्सी सेवा ही सेवाच असल्याचे सांगितले. कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे करावा, असे आवाहन करताना प्रवाशांचे पैसे, दागिने किंवा मौल्यवान वस्तू सापडल्यानंतर पोलिसांकडे जमा करणाऱ्या प्रामाणिक चालकांचे त्यांनी कौतुक केले. अशा चालकांचा समाजात आदर्श म्हणून गौरव होतो, असे त्यांनी नमूद केले.मुंबईत राहणारा आणि मराठीवर प्रेम करणारा प्रत्येक मुंबईकर हा आपला नातेवाईक, मित्र आणि आपला माणूस आहे, अशी भावना ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोकण मराठी साहित्य परिषदेसह मराठी शिकविणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक केले.आपण मुख्यमंत्री असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा निर्णय झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यास मान्यता दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. गोमातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचाही उल्लेख त्यांनी केला.महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख ६० हजार जणांनी मराठी शिकली असून त्याचा अभिमान बाळगा, असे सांगत त्यांनी इतरांनीही मराठी शिकावी, तिचा प्रचार-प्रसार करावा, असे आवाहन केले.

चांगल्या कामात विघ्न आणणाऱ्यांना बळी न पडता सर्वांना सोबत घेऊन मुंबईचा विकास करण्याचे आवाहन करत “मुंबई रोजीरोटी देणारी आहे; मुंबईवर आणि मराठीवर प्रेम करा,” असे शिंदे म्हणाले. गोविंदा उत्सव आणि गणेशोत्सवही मोठ्या उत्साहात साजरे करून संस्कृती-परंपरा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मुरजी पटेल , आमदार प्रा. मनिषा कायंदे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्यासह शिवसेनेचे सर्व खासदार आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, रिक्षा-टॅक्सी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *