Brihanmumbai Municipal corporation: मुंबई महापालिका मुख्यालयावर आता ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; सुरक्षा व्यवस्था होणार अधिक मजबूत!
ताज्या बातम्या न्यूज मुंबई

Brihanmumbai Municipal corporation: मुंबई महापालिका मुख्यालयावर आता ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; सुरक्षा व्यवस्था होणार अधिक मजबूत!

Aug 17, 2026

मुंबई १७ : मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील जुन्या इमारतीमधील सुरक्षेचा स्तर उंचावण्यासाठी तेथील जुने सीसीटीव्ही कॅमेरे बदलून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन यंत्रणा बसवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मुख्यालयात तब्बल ८७ अत्याधुनिक ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. या नवीन यंत्रणेमुळे मुख्यालयातील कर्मचारी, अधिकारी तसेच दररोज येणाऱ्या अभ्यागतांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.हे एआय तंत्रज्ञानयुक्त कॅमेरे रिअल-टाईम धोका ओळखणे, चेहऱ्याची ओळख पटवणे आणि स्वयंचलित सूचना किंवा इशारे देण्यास सक्षम आहेत.

त्यामुळे परिसरातील सुरक्षितता अधिक मजबूत होण्यास मदत होईल. या प्रकल्पांतर्गत ४१ डोम एआय कॅमेरे, ४४ एआय बुलेट कॅमेरे आणि २ पीटीझेड कॅमेरे अशा एकूण ८७ कॅमेऱ्यांची खरेदी केली जात आहे. विविध करारांसह या कामासाठी ३.७४ कोटी रुपये खर्च केले जाणार असून, या कामासाठी सहोरा कॉर्पोरेशन या कंपनीची निवड करण्यात आली आहे.कॅमेरे बसवल्यानंतर पुढील चार वर्षांच्या देखभालीचाही यात समावेश असून, त्यासाठी ३५.४१ लाख रुपये खर्च केले जातील.

समितीच्या मंजुरीनंतर पुढील ९ महिन्यांत हे कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण होईल. कोणत्याही अनुचित घटना किंवा अपघात टाळण्यासाठी आणि मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सुरक्षेचा आढावा घेऊन कुठे डोम आणि कुठे बुलेट कॅमेरे बसवायचे, याचा आराखडा तयार करून निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचे यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *