Buldhana : भाजप सरपंचाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; पक्षात अंतर्गत त्रासाचे गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ!
बुलढाणा ११ : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. करमोडा गावचे लोकप्रिय आणि विद्यमान लोकनियुक्त भाजप सरपंच दीपक प्रकाश उगले यांनी स्वतःच्या शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व शोककळा पसरली आहे.व्हिडिओ संदेशात पक्षात अंतर्गत त्रासाची पोलखोलटोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी दीपक उगले यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी केला होता, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मानसिक त्रासाची कैफियत मांडली.
अत्यंत उद्विग्न मनःस्थितीत त्यांनी उघड केले की, “माझ्याच पक्षातील काही राजकीय विरोधक आणि नेते मला सतत त्रास देत आहेत. त्यांच्या धमक्या आणि मानसिक छळाला मी आता कंटाळलो आहे.” आपल्याच पक्षातील लोकांच्या या जाचाला कंटाळून आयुष्य संपवत असल्याचे सांगत त्यांनी गंभीर आरोप केले. प्राथमिक माहितीनुसार, ज्यांच्यावर आरोप आहेत ती व्यक्तीही भाजपचीच असल्याने या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. दीपक उगले यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच स्वतःच्या शेतात जाऊन हे टोकाचे पाऊल उचलले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी व समर्थकांनी शेताकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
एका तरुण आणि कार्यक्षम सरपंचाच्या अशा अकाली जाण्याने करमोडा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.पोलीस तपासाला वेग आणि निष्पक्ष कारवाईची मागणीघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तो व्हिडिओ तपासासाठी ताब्यात घेतला असून, त्यातील मजकूर आणि पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व दोषांवर त्वरित व कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थ व समर्थकांकडून केली जात आहे!
