Eknath shinde: ब्रिटिश संसदेत महाराष्ट्राचा गौरव: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘कॉमनवेल्थ लीडरशिप’ पुरस्काराने होणार सन्मान… ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मधील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’;दोन दिवसीय दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री लंडनला रवाना!
ताज्या बातम्या

Eknath shinde: ब्रिटिश संसदेत महाराष्ट्राचा गौरव: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘कॉमनवेल्थ लीडरशिप’ पुरस्काराने होणार सन्मान… ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मधील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’;दोन दिवसीय दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री लंडनला रवाना!

Sep 9, 2026

मुंबई, दि. ८: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेत दि. ९ आणि १० सप्टेंबर रोजी दोन महत्वपूर्ण आणि स्वतंत्र कार्यक्रम होणार असून त्याचे विशेष निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले आहे. या दोन दिवसीय लंडन दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना तीन विविध पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

त्यामध्ये ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ लॉर्डस् मध्ये श्री. शिंदे यांचा ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या पुरस्कारासोबतच ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये त्यांना ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळातर्फे ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येणार आहे. दरम्यान, या दोन दिवसीय दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे लंडनला रवाना झाले.

यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सोहळा पार पडणार आहे. उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर द राइट ऑनरेबल बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक यांच्या वतीने कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांनी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना निमंत्रण पाठवले आहे. श्री.शिंदे मुख्यमंत्रीपदी असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून राबवलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीसाठी हा बहुमान दिला जाणार असल्याचे निमंत्रकांनी म्हटले आहे.

या सन्मानासाठी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या कार्यकाळातील तीन प्रमुख कल्याणकारी योजनांची विशेष दखल घेतली असून यामध्ये महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठीची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, नागरिकांना शासकीय सेवा थेट घरापर्यंत पोहोचवणारा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम आणि तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व रोजगार मिळवून देणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.हा सन्मान पूर्णपणे प्रशासकीय कार्यक्षमता, महिला सक्षमीकरण आणि थेट लाभ हस्तांतरण यांवर आधारित असल्याचे युकेएबीसीने स्पष्ट केले आहे. याशिवाय, या सोहळ्यादरम्यान ‘कॅनव्हास फॉर केअर’ या संसदीय कला प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले असून, यात ब्रिटनमधील मुलांनी महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण योजना’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या योजनांच्या संकल्पनेवर रेखाटलेली चित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.

‘हाऊस ऑफ कॉमन्स’मधील आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडणार महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन….

दरम्यान, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी इंडो-युरोपियन बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६: ग्लोबल बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट डायलॉग’ चे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. याच सोहळ्यात उपमुख्यमंत्र्यांना ‘स्टेटसमनशिप अवॉर्ड’ने गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र हे भारताचे प्रमुख आर्थिक व गुंतवणूक केंद्र असल्याने, परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आणि भारत-यूके आर्थिक संबंधांविषयीचे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, महाराष्ट्रातील नगरविकास, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात केलेल्या गतिमान कामगिरीबाबत या परिषदेत त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सत्कारही केला जाणार आहे.या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य, ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर एकत्र येणार आहेत.

या जागतिक व्यासपीठावरून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे हे ब्रिटिश संसदेत आपले विचार मांडणार असून, यामुळे महाराष्ट्र आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार, उद्योग आणि गुंतवणुकीला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.चौकटलंडनच्या महाराष्ट्र मंडळातर्फे होणार उपमुख्यमंत्र्यांच्या सन्मानया लंडन दौऱ्यात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे हे महाराष्ट्र मंडळाच्या महाराष्ट्र भवनालाही भेट देणार आहेत. या महाराष्ट्र मंडळास ९४ वर्षांचा इतिहास आहे. याप्रसंगी, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’नेसह उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल शिंदे यांचा ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ या सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *