Maharashtra coaching classes regulation: मोठी बातमी…खासगी कोचिंग क्लासेसवर आता सरकारचा अंकुश; ५ तासांपेक्षा जास्त क्लास घेतल्यास होणार कारवाई!
ताज्या बातम्या शिक्षण

Maharashtra coaching classes regulation: मोठी बातमी…खासगी कोचिंग क्लासेसवर आता सरकारचा अंकुश; ५ तासांपेक्षा जास्त क्लास घेतल्यास होणार कारवाई!

Aug 24, 2026

मुंबई/पुणे २४ : राज्यातील खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे ‘महाराष्ट्र खाजगी कोचिंग केंद्र नोंदणी आणि नियमन अधिनियम, २०२६’ या नवीन कायद्याचा मसुदा प्रसिद्ध करण्यात येणार असून, याद्वारे राज्यातील कोचिंग क्लासेसवर कठोर बंधने आणली जाणार आहेत. स्पर्धा परीक्षा आणि नीट सारख्या परीक्षांच्या नावाखाली चालणारा कोचिंग क्लासेसचा बाजार, अवाजवी फी, विद्यार्थ्यांचे होणारे मानसिक खच्चीकरण आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने हा कठोर मसुदा तयार केला आहे.या नवीन नियमांनुसार कोचिंग क्लासेसचा कालावधी दिवसातून जास्तीत जास्त ५ तास असेल, तसेच वर्ग सकाळी खूप लवकर किंवा रात्री उशिरा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आठवड्यातून एक दिवस सुट्टी अनिवार्य असेल आणि सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी कोणतीही चाचणी किंवा परीक्षा घेता येणार नाही. याशिवाय १३ वर्षांखालील बालकांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देण्यावर पूर्णपणे बंदी असेल. क्लासेसना परीक्षेमध्ये रँक किंवा गुणांची खोटी व दिशाभूल करणारी आश्वासने देता येणार नाहीत, तसेच मुलांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या पाडण्यासही सक्त मनाई असेल. शासनाने नोंदणी आणि पारदर्शकतेवरही विशेष भर दिला आहे. २५ पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या प्रत्येक कोचिंग सेंटरला कायदा लागू झाल्यापासून ६ महिन्यांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक असेल आणि ही नोंदणी ३ वर्षांसाठी वैध राहील. शिकवणी देणारे शिक्षक किमान पदवीधर असणे आवश्यक असून कोणत्याही गंभीर गुन्ह्याची नोंद असलेल्या व्यक्तीला नोकरीवर ठेवता येणार नाही.

कोचिंग सेंटर्सना त्यांच्या संकेतस्थळावर शिक्षक, अभ्यासक्रम, फी, वेळापत्रक, सुविधा आणि परतावा धोरण प्रसिद्ध करावे लागेल. तसेच कोचिंग सेंटर्सना मान्यताप्राप्त शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांच्या आवारात वर्ग चालवता येणार नाहीत, तसेच शाळांमधील शिक्षकांना नोकरीवर ठेवण्यास किंवा शाळांसोबत कोणतेही व्यावसायिक एकत्रीकरण करण्यास मनाई असेल.भौतिक सुविधांच्या बाबतीत, आकारलेल्या सर्व फीची अधिकृत पावती द्यावी लागेल आणि अभ्यासक्रम सुरू झाल्यावर फी वाढवता येणार नाही. विद्यार्थ्याने मध्यंतरीच क्लास सोडल्यास उर्वरित कालावधीची फी १० दिवसांच्या आत परत करावी लागेल. तळघरामधून कोचिंग क्लास चालवण्यास पूर्ण बंदी असेल. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी किमान १ चौरस मीटर जागा, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, पिण्याचे पाणी, स्वतंत्र शौचालये आणि १ महिना रेकॉर्डिंग जतन करणारे सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असतील.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

किरकोळ उल्लंघनासाठी १ लाख ते ५ लाखांपर्यंत दंड वारंवार उल्लंघन केल्यास १० लाखांपर्यंत आणि गंभीर उल्लंघनासाठी १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोचिंग सेंटरची नोंदणी रद्द करण्याचा आणि वर्ग कायमचे बंद करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना असेल. हा मसुदा सध्या नागरिक, पालक आणि संस्थाचालकांच्या सूचना व हरकतींसाठी खुला करण्यात आला असून, येत्या सप्टेंबर महिन्यात त्यावर सरकार अंतिम विचार करून कायदा अंमलात आणण्याची शक्यता आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *