Mumbai: मुंबई हादरली…धावत्या लोकलमध्ये वादातून तरुणाला बाहेर ढकललं; गंभीर जखमी तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू!
मुंबई २१ : मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमधून एका तरुणाला बाहेर ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारापूर्वीच तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना चर्चगेट-बोरीवली या धीम्या लोकल ट्रेनमध्ये घडली असून यामुळे संपूर्ण मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास (सुमारे दीड वाजता) लोकल वांद्रे स्थानकात दाखल झाली. वांद्रे-माहिम दरम्यान वांद्रे खाडीवरील पुलावरून लोकल जात असताना अपंगांच्या (दिव्यांग) डब्यात ही घटना घडली. या डब्यात हा तरुण प्रवासी चढला होता.
त्यावेळी प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून एका प्रवाशाने तरुणाला धावत्या ट्रेनमधून धक्का दिला, ज्यामुळे तो थेट वांद्रे खाडी पुलावर पडला.धावत्या लोकलवरून खाली पडल्यामुळे तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी जखमी तरुणाला तातडीने वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती आणि रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा प्राण गेला. डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे वांद्रे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी धक्का देणाऱ्या अमजद सफरउद्दीन शेख (वय ४८ वर्षे) या आरोपीला वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमजद शेख हा चर्चगेट पूर्वेकडील दर्ग्याजवळील फूटपाथवर राहत असल्याची माहिती आहे. लोकलच्या डब्यात कावळा आल्याने तो कावळा हाकलण्याचा प्रयत्न करत होता आणि याच प्रयत्न करताना मृत व्यक्तीला धक्का लागला, असा प्राथमिक दावा आरोपी अमजदने पोलिसांसमोर केला आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाकडून पाहणी केली जाणार असून वांद्रे रेल्वे पोलिसांकडून या घटनेचा पुढील सखोल तपास सुरू आहे!
