Ratnagiri: रत्नागिरीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; संपूर्ण कोकणात शोककळा!
न्यूज राजकारण

Ratnagiri: रत्नागिरीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; संपूर्ण कोकणात शोककळा!

Aug 6, 2026

रत्नागिरी: रत्नागिरीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे काल संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. ते कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत असताना प्रवासादरम्यानच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. या धक्कादायक घटनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे.प्रवासादरम्यान प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना पाली येथील रुग्णालयात दाखल केले.

मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुःखाद बातमीने त्यांच्या कुटुंबीयांवर, कार्यकर्त्यांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.राजेश सावंत यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली होती. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली.

उत्तम संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद आणि शांत स्वभाव यामुळे त्यांनी राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. राजकारणाव्यतिरिक्त ते एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणूनही परिचित होते, तसेच क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या निधनामुळे रत्नागिरी जिल्ह्याने एक लोकप्रिय, मनमिळाऊ आणि सर्वपक्षीय मैत्री जपणारे नेतृत्व गमावले आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *