Thane: ठाणे जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून ‘Framework for Fertilizer Sale’ प्रणाली लागू; शेतकऱ्यांना मोबाईलवरून खताची उपलब्धता तपासून ऑनलाइन बुकिंगची सुविधा; खत विक्री प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार!
न्यूज शेती

Thane: ठाणे जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून ‘Framework for Fertilizer Sale’ प्रणाली लागू; शेतकऱ्यांना मोबाईलवरून खताची उपलब्धता तपासून ऑनलाइन बुकिंगची सुविधा; खत विक्री प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार!

Aug 13, 2026

ठाणे, दि. १३: (जिल्हा परिषद, ठाणे) : शेतकऱ्यांना रासायनिक खतांची उपलब्धता सहजपणे तपासता यावी तसेच खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी केंद्र शासनाच्या ‘Framework for Fertilizer Sale’ या उपक्रमांतर्गत ऑनलाइन खत विक्री प्रणाली ठाणे जिल्ह्यात दि. १५ ऑगस्ट २०२६ पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरून उपलब्ध खतांचा साठा तपासता येणार असून, आवश्यकतेनुसार खतांचे ऑनलाइन बुकिंग करून जवळच्या उपलब्ध विक्रेत्याची निवड करता येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये या प्रणालीचा यशस्वी प्रयोग करण्यात आल्यानंतर आता ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, लातूर, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यात सुमारे १ लाख ३८ हजार ८६२ शेतकरी असून खरीप हंगामाचे सुमारे ५९ हजार ८३१ हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, नियोजनबद्ध खतपुरवठ्यामुळे सध्या रासायनिक खतांची टंचाई निर्माण झालेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत सुमारे १,६११ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्याला दरवर्षी सुमारे १० ते ११ हजार मेट्रिक टन खताची आवश्यकता भासते. युरिया खताला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात येते.

मोबाईलवरून खताची उपलब्धता तपासता येणार

‘Framework for Fertilizer Sale’ प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलद्वारे आपल्या आवश्यकतेनुसार युरिया, डीएपी यांसारख्या अनुदानित खतांची खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया करता येणार आहे. शेतकऱ्यांना उपलब्ध खतसाठा, विक्रेत्याचे ठिकाण तसेच उपलब्धतेनुसार योग्य विक्रेता निवडण्याची सुविधा या प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रणालीवर शेतकऱ्यांना आधार क्रमांक किंवा Farmer ID च्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला QR Code आणि Token Number प्राप्त होईल. हा QR Code संबंधित खत विक्रेत्याकडे दाखवल्यानंतर विक्रेत्यामार्फत त्याचे स्कॅनिंग करून निर्धारित प्रमाणानुसार खताचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल.

या ऑनलाइन प्रणालीमुळे खताची उपलब्धता, बुकिंग आणि वितरण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक, नियोजनबद्ध आणि शेतकरीहिताची होण्यास मदत होणार आहे. तसेच खत उपलब्ध आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रावर वारंवार जाण्याची आवश्यकता कमी होणार असून, त्यांचा वेळ व प्रवासाचा खर्च वाचणार आहे.

१. लॉगिन व पडताळणी :
मोबाईलमध्ये ‘Framework for Fertilizer Sale’ अॅप उघडून राज्याची निवड करावी. त्यानंतर आधार क्रमांक प्रविष्ट करून प्राप्त OTP द्वारे पडताळणी पूर्ण करावी.

२. जमिनीची नोंदणी :
जमीन स्वतःच्या मालकीची, भाडेकरू अथवा संयुक्त मालकीची असल्यास संबंधित पर्याय निवडावा. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव आणि सर्व्हे/गट क्रमांकाची माहिती भरून ‘Fetch Land’ पर्यायाद्वारे जमिनीची माहिती प्राप्त करावी.

३. पीक निवड :
संबंधित हंगामाची निवड करून लागवड केलेले पीक निवडावे. निवडलेल्या पिकानुसार खताची शिफारस उपलब्ध होईल.

४. खतासाठी अर्ज :
शासनाच्या GFR (General Fertilizer Recommendation) नुसार शिफारस करण्यात आलेल्या खतांची यादी व प्रमाण अॅपवर दिसेल. त्यानुसार आवश्यक खताची निवड करावी.

५. खताचे प्रमाण निश्चित करणे :
आवश्यक खताच्या बॅगांची संख्या निवडावी. एका अर्जामध्ये एकापेक्षा अधिक प्रकारची खते निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे.

६. खत विक्रेता निवडणे :
जवळील उपलब्ध खत विक्रेत्यांची यादी अॅपवर उपलब्ध होईल. उपलब्ध साठा आणि अंतर यांचा विचार करून योग्य विक्रेत्याची निवड करावी.

७. खत घेणारी व्यक्ती निवडणे :
खत स्वतः घेणार असल्यास ‘स्वतः’ हा पर्याय निवडावा. प्रतिनिधीमार्फत खत घेणार असल्यास संबंधित प्रतिनिधीची माहिती भरावी. आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकाची पडताळणी आवश्यक राहील.

८. QR Code व Token Number प्राप्त करणे :
अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यानंतर QR Code आणि Token Number तयार होईल. हा QR Code सुरक्षितपणे जतन करून ठेवावा.

९. खत प्राप्त करणे :
निवडलेल्या विक्रेत्याकडे जाऊन QR Code दाखवावा. विक्रेत्यामार्फत QR Code स्कॅन करून अर्जातील माहिती व खताचे प्रमाण तपासले जाईल. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला खत उपलब्ध करून देण्यात येईल व त्याची पावती घ्यावी.

प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभाग सज्ज

ठाणे जिल्ह्यात ‘Framework for Fertilizer Sale’ प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी कृषी विभागामार्फत आवश्यक पूर्वतयारी करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी तसेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. तसेच QR Code च्या माध्यमातून खत विक्रीसाठी विकसित करण्यात आलेल्या नवीन प्रणालीची कार्यपद्धती संबंधितांना समजावून सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना या प्रणालीचा सहज वापर करता यावा, यासाठी प्रणालीबाबत आवश्यक जनजागृती व प्रचार-प्रसिद्धीही कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी नवीन प्रणालीचा वापर करून खत खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

“ठाणे जिल्ह्यात दि. १५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान ‘Framework for Fertilizer Sale’ ही ऑनलाइन खत विक्री प्रणाली सुरू होत आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून खताची उपलब्धता तपासता येईल आणि आपल्या गरजेनुसार उपलब्ध विक्रेत्याची निवड करून खताचे ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. आधार किंवा Farmer ID च्या माध्यमातून नोंदणी करून QR Code द्वारे खत प्राप्त करता येणार असल्याने खत खरेदी व वितरण प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचविण्यासोबतच खत वितरणाचे अधिक प्रभावी नियोजन करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,” अशी माहिती कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे मुनिर बाचोटीकर यांनी दिली.

महत्त्वाच्या सूचना

खत खरेदीसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक राहील.
शेतकऱ्यांची जमिनीची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे.
GFR नुसार शिफारस करण्यात आलेल्या खताची माहिती तपासूनच खताची निवड करावी.
ऑनलाइन बुकिंगनंतर प्राप्त झालेला QR Code सुरक्षित ठेवावा.
चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्जाच्या प्रक्रियेत विलंब होऊ शकतो.
खताची खरेदी केवळ नोंदणीकृत खत विक्रेत्याकडूनच करावी.
खत विक्री व वितरणासंदर्भातील अधिकृत माहिती कृषी विभागाकडूनच घ्यावी.

तक्रार निवारण सुविधा

ऑनलाइन अर्ज, खताची उपलब्धता, बुकिंग अथवा खत वितरणासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी, गुणनियंत्रण निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीतील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधता येईल. प्राप्त तक्रारीची पडताळणी करून पात्र प्रकरणांमध्ये नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १५ ऑगस्टपासून कार्यान्वित होणाऱ्या ‘Framework for Fertilizer Sale’ या नवीन ऑनलाइन प्रणालीचा वापर करून खताची उपलब्धता, बुकिंग आणि खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ करून घ्यावी आणि या डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद, ठाणेच्या कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *