Thane: ठाण्याच्या कचऱ्यामुळे भिवंडीत दुर्गंधी; १२ गावांतील रहिवाशांची उच्च न्यायालयात धाव!
ठाणे १४: ठाणे शहरात दररोज सुमारे १,२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यातील सुमारे ८०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा ठाणे महापालिकेकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात शहरातील तब्बल ६० टक्के कचरा भिवंडीतील आतकोली भागात टाकला जात आहे. तेथील ८५ एकर जागेत पालिका कचरा टाकते. कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी तेथे कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याचे उघड झाले आहे. पावसाळ्यात या कचऱ्यातील दुर्गंधीयुक्त पाणी थेट शेतात शिरत असल्याने शेतीचे अतोनात नुकसान होत आहे, तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.आतकोली परिसरात १२ ग्रामपंचायती असून सुमारे ३५ ते ३७ हजारांची लोकसंख्या आहे. येथे वेअरहाऊस, गोडाऊन आणि एमआयडीसीचे प्रकल्प असल्याने नोकरी-धंद्यासाठी दररोज हजारो नागरिक येत असतात. या १२ ग्रामपंचायतींनी सुरुवातीपासूनच या कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
कचरा टाकण्यापूर्वी तेथे शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाईल असे आश्वासन महापालिकेने दिले होते, परंतु कोणतीही प्रक्रिया न करता दररोज सुमारे १५० डंपर कचरा तेथे उघड्यावर टाकला जात आहे. २०१४ पासून तळवली, आतकोली आणि आमणे परिसरात कचरा टाकला जात असून, या विरोधात स्थानिक रहिवाशांनी उच्च न्यायालयात दोन याचिकाही दाखल केल्या आहेत.दुसरीकडे, ठाण्यात निर्माण होणाऱ्या कचऱ्यात सुमारे ५५ टक्के ओला कचरा असतो. प्रक्रिया क्षमतेतील तफावत भरून काढण्यासाठी पालिकेने हिरानंदानी, कोलशेत, कळवा, ऋतू पार्क अशा १६ ठिकाणी विकेंद्रित प्रकल्प उभारले आहेत. कळवा येथे २० टन क्षमतेच्या प्रकल्पात बायोगॅस आणि कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केली जाते.
तसेच डायघर येथे ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १९ पैकी ११ हेक्टर जागा पालिकेच्या ताब्यात आहे. तेथे कचऱ्यापासून सुमारे १,४०० मेगावॉट वीजनिर्मितीचा प्रयत्न गेल्या १६ वर्षांपासून सुरू आहे, परंतु त्यात पालिकेला अद्याप यश आलेले नाही. परिणामी प्रक्रिया न झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, दुर्गंधी आणि आरोग्याच्या त्रासाला कंटाळलेल्या आतकोली परिसरातील नागरिकांनी आता उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे!
