उच्च शिक्षण घेणाऱ्या Gen Z तरुणींना सरकारकडून दरमहा २ हजार रुपये पॉकेटमनी मिळण्याची शक्यता; विरोधकांकडून मात्र कडाडून विरोध!
ताज्या बातम्या शिक्षण

उच्च शिक्षण घेणाऱ्या Gen Z तरुणींना सरकारकडून दरमहा २ हजार रुपये पॉकेटमनी मिळण्याची शक्यता; विरोधकांकडून मात्र कडाडून विरोध!

Aug 21, 2026

लाडकी बहीण योजना राबवताना सरकारची तारेवरची कसरत होत असताना आता Gen Z विद्यार्थिनींसाठी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला दोन हजार रुपये पॉकेटमनी देण्याच्या हालचाली उच्च व तंत्रशिक्षण खात्याने सुरू केल्या आहेत. ‘Earn and Learn’ (कमवा आणि शिका) या संकल्पनेवर आधारित या योजनेमुळे विद्यार्थिनींना आर्थिक मदत आणि पाठबळ मिळणार आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील काही महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी मंत्रालयात संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि या नव्या योजनेचे सूतोवाच केले.

या योजनेचा फायदा राज्यातील सुमारे १२ लाख विद्यार्थिनींना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मात्र, सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत हल्लाबोल केला आहे. “फुकट पैसे कसले वाटताय? पॉकेटमनी देणे हे पालकांचे काम आहे. जर सरकारने दिलेला हा पॉकेटमनी मुलांनी दारू, सिगारेट किंवा नशेसाठी वापरला तर त्याची जबाबदारी सरकार आणि चंद्रकांत पाटील घेणार आहेत का?” असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे. त्यापेक्षा कॉलेजचा दर्जा सुधारा” अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे. राज्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते, त्यामुळे सुविधा सुधारण्याची मागणीही या निमित्ताने पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी महाविद्यालयांमध्ये काही सुधारणा करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *