काँग्रेसच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तीव्र निषेध!
ठाणे ०४: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जि.)च्या वतीने आज काँग्रेसच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर शाई फेकून संताप व्यक्त केला.
तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या छायाचित्रांचे दहन करून निषेध नोंदविण्यात आला.यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची बेजबाबदार व अवमानकारक वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. संबंधितांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जि.) चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
