दररोज विरार-चर्चगेट लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा; पश्चिम रेल्वेची नवी योजना!
मुंबई वाहतूक

दररोज विरार-चर्चगेट लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा; पश्चिम रेल्वेची नवी योजना!

Jul 31, 2026

मुंबई ३१ : मुंबई उपनगरी रेल्वेतील प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विरार-चर्चगेट मार्गावरील लोकल गाड्यांमध्ये आता खाद्यपदार्थांव्यतिरिक्त (नॉन-कॅटरिंग) वस्तूंची विक्री करण्यासाठी अधिकृत विक्रेते नियुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ४० विक्रेत्यांची निवड केली जाणार असून, प्रवाशांना लोकलमध्येच आवश्यक वस्तू सहज उपलब्ध होतील.


चर्चगेट ते विरार हा प्रवास साधारण दीड ते दोन तासांचा असल्याने या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने अधिकृत विक्री व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासही मदत होणार आहे.


रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या योजनेमुळे पश्चिम रेल्वेला दरवर्षी अंदाजे २५ ते २७ लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. तसेच, परवानाधारक विक्रेते असल्याने बेकायदेशीर विक्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे सोपे होईल.सध्या विरार-चर्चगेट मार्गावर दररोज २० ते २५ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि वाणिज्य विभागाकडून नियमित कारवाई होत असली, तरी अनधिकृत विक्री पूर्णपणे थांबलेली नाही. त्यामुळे अधिकृत विक्रेत्यांना ओळखपत्र आणि परवाने देऊन ही व्यवस्था राबविण्यात येणार आहे.


कोणत्या वस्तू विकता येणार?


अधिकृत विक्रेत्यांना पेन, रुमाल, मास्क, मोबाईल अ‍ॅक्सेसरीज, खेळणी, लहान घरगुती वस्तू आणि इतर नॉन-कॅटरिंग वस्तू विक्रीसाठी परवानगी दिली जाणार आहे.


दरम्यान, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने सर्व ७९४ महिला डब्यांमध्ये ‘इमर्जन्सी टॉकबॅक’ यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र, पश्चिम रेल्वेवरील ४५ महिला डब्यांमध्ये ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही. या सुविधेमुळे आपत्कालीन परिस्थितीत महिला प्रवाशांना थेट लोको पायलट किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येणार असून, मदत अधिक जलद मिळण्यास मदत होणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *