नाशिक: शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय!
नाशिक शिक्षण

नाशिक: शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय!

Aug 1, 2026

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. आठ तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आज जिल्ह्यातील आठ प्रमुख तालुक्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करत अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी गरज आसुसले तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान, संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी NDRF ची एक टीम नाशिकमध्ये तैनात करण्यात आली आहे. तसेच सर्व संबंधित विभागांना आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सतत पडणारा पाऊस आणि नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीचा विचार करून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, धबधबे, ट्रेकिंग पॉईंट्स तसेच पूरप्रवण भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाने सखल आणि धोकादायक भागांतील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासन आणि हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *