मुंबईच्या जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात साकारणार भव्य वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय चितळसर-मानपाड्यातील १० हेक्टर जागेवर महत्त्वाकांक्षी प्रकल्प,राज्य शासनाकडून निधीला मंजुरी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
अर्थकारण ठाणे

मुंबईच्या जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात साकारणार भव्य वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय चितळसर-मानपाड्यातील १० हेक्टर जागेवर महत्त्वाकांक्षी प्रकल्प,राज्य शासनाकडून निधीला मंजुरी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!

Jul 30, 2026

ठाणे : (३० जुलै) मुंबईतील प्रसिद्ध जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर ठाणे शहरातही निसर्ग, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाचा अनोखा संगम घडविणारे अत्याधुनिक वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय विकसित करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र. ४, मौजे चितळसर-मानपाडा (टिकुजिनी वाडी) येथील सुमारे १० हेक्टर जागेवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.राज्यातील महानगरपालिकां मध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून अनुदान दिले जाते. त्याअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार ठाणे शहरातील विविध विकासकामांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला असून, त्यामध्ये या वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या विकासाचाही समावेश करण्यात आला आहे.

“वेगाने विस्तारत असलेल्या ठाणे शहराला केवळ रस्ते, पूल आणि इमारतींचीच नव्हे, तर नागरिकांच्या जीवनमानात भर घालणाऱ्या पर्यावरणपूरक प्रकल्पांचीही आवश्यकता आहे. मुंबईतील जिजामाता भोसले उद्यानाप्रमाणे ठाणेकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा मिळावा, मुलांना जैवविविधतेची ओळख व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार नव्या पिढीमध्ये रुजावेत, या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.चितळसर-मानपाडा परिसरातील सर्वे क्रमांक ५१/अ/१/१ येथील जागेवर प्रस्तावित या प्रकल्पामुळे ठाणे शहराला एक नवे ‘ग्रीन डेस्टिनेशन’ मिळणार आहे. विविध प्रजातींच्या वनस्पतींचे संवर्धन, पर्यावरणविषयक जनजागृती, जैवविविधतेचे दर्शन आणि नागरिकांसाठी दर्जेदार विरंगुळ्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध करण्याचा मानस आहे.राज्य शासनाच्या २० जुलै २०२६ रोजीच्या शासन शुद्धीपत्रकानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कामांसाठी एकूण ₹१५० कोटींची मंजूर रक्कम नमूद करण्यात आली असून, त्यामध्ये या प्रकल्पासाठी सुरुवातीला ₹१० कोटींची तरतूद दर्शविण्यात आली आहे.

सरनाईक म्हणाले, “ठाणे शहराचा विकास करताना पर्यावरण आणि नागरीकरण यांचा समतोल राखणे ही आमची प्राथमिकता आहे. या उद्यानामुळे ठाणेकरांना शहरातच निसर्ग अनुभवता येईल. विशेषतः विद्यार्थी आणि नव्या पिढीसाठी हा प्रकल्प मनोरंजनासोबतच निसर्गशिक्षणाचे केंद्र ठरेल. भविष्यात ठाण्याची ओळख वाढविणाऱ्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांमध्ये या उद्यानाचा समावेश व्हावा, या दृष्टीने त्याचा दर्जेदार विकास केला जाईल.”या प्रकल्पामुळे चितळसर-मानपाडा परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच ठाण्याच्या पर्यटन क्षमतेलाही नवी चालना मिळणार आहे. “ठाणेकरांना मुंबईत जावे लागू नये; ठाण्यातच कुटुंबासह निसर्ग, जैवविविधता आणि विरंगुळ्याचा समृद्ध अनुभव मिळावा, हेच या प्रकल्पामागचे उद्दिष्ट आहे,” असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *