ठाणे १: प्रतिनिधीठाणे महानगरपालिकेत 21 वर्षे सेवा बजावणारे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी सन्मान करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या पत्रकार कक्षात आयोजित या कार्यक्रमाला सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या हस्ते माळवी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच त्यांच्या निवृत्तीनिमित्त संघाच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.2005 मध्ये ठाणे महानगरपालिकेत रुजू झालेल्या संदीप माळवी यांनी गेली 21 वर्षे विविध पदांवर जबाबदारी पार पाडली.
जनसंपर्क अधिकारी, उपायुक्त, आणि अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. प्रशासन आणि पत्रकार यांच्यातील समन्वय प्रभावीपणे राखला. अतिरिक्त आयुक्त पदावर असताना ते शुक्रवारी (31जुलै) सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवेबद्दल ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी संदीप माळवी यांच्या पत्रकारांना केलेल्या सहकार्यांची माहिती दिली. पत्रकार कक्षासाठी मिळालेले त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नसल्याचे सांगितले. तर ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी कोविड काळात पत्रकारांना केलेल्या त्यांच्या योगदानाची माहिती देत त्यांचे आभार मानले.
यावेळी इतर पत्रकारांनीही त्यांच्या कार्याचा उहापोह केला. पत्रकारांशी संवाद साधताना ते नेहमी उपलब्ध असत आणि प्रशासनाच्या कामकाजाबाबत पारदर्शक माहिती देत असत, असा उल्लेख पत्रकारांनी केला.शेवटी संदीप माळवी यांनी त्यांचा अतिरिक्त पदापर्यंतचा प्रवास कसा झाला याची माहिती दिली. ठाणे महानगर पालिकेत काम करताना पत्रकारांसोबत अधिकाराने वागलो. त्यांच्याशी मित्रत्वाची भावना जपली. प्रशासनाचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे.
निवृत्तीनंतरही मी पत्रकार आणि ठाणे शहरासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन, विचार मांडले. असे विचार मांडले. यावेळी जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, सेवा निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सदाशिव कांबळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सरचिटणीस राजीव डाके यांनी केले.
