ठाणेतील १४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती, दिव्यांग आरक्षणातूनही ५ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ; जबाबदारीने व प्रामाणिकपणे कार्य करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे आवाहन!
ठाणे न्यूज

ठाणेतील १४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती, दिव्यांग आरक्षणातूनही ५ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ; जबाबदारीने व प्रामाणिकपणे कार्य करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे आवाहन!

Jul 31, 2026

ठाणे, दि. ३१ (जिल्हा परिषद, ठाणे): जिल्हा परिषद ठाणेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत आज, दि. ३१ जुलै, २०२६ रोजी पदोन्नती आदेश वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर २, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर ३ आणि वरिष्ठ सहाय्यक पदावर ९ अशा एकूण १४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश प्रदान करण्यात आले.या पदोन्नती प्रक्रियेमध्ये शासनाच्या आरक्षण धोरणाचे काटेकोर पालन करण्यात आले असून, दिव्यांग आरक्षणातून सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर १, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर १ आणि वरिष्ठ सहाय्यक पदावर ३ अशा एकूण ५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला.

जिल्हा परिषद प्रशासनाच्या सर्वसमावेशक आणि समान संधी देण्याच्या धोरणाचा हा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.पदोन्नती आदेश वितरण प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पदोन्नती झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. पदोन्नती ही केवळ पदातील वाढ नसून ती अधिक जबाबदारी, कर्तव्यनिष्ठा आणि लोकाभिमुख सेवा देण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी संबोधित करताना सांगितले की, “प्रत्येक पदोन्नती ही आपल्या कामाची पावती असते. नवीन पदाची जबाबदारी स्वीकारताना प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि लोकहिताचा दृष्टिकोन कायम ठेवून कार्य करणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषद ठाणेच्या विकासात आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपले मौल्यवान योगदान द्यावे. प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून काम करणे ही गरज आहे.”उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनीही पदोन्नती प्राप्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या.”जिल्हा परिषद प्रशासनाने पदोन्नतीची प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करून माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, जिल्हा परिषद प्रशासन आणि सामान्य प्रशासन विभाग प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचे मनःपूर्वक आभारी आहे.

ही पदोन्नती माझ्यासाठी सन्मानासोबतच अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे. नवीन पदाचा मान राखत प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि नागरिकाभिमुख दृष्टीकोनातून कार्य करून जिल्हा परिषद ठाणेच्या विकासात अधिक प्रभावी योगदान देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”– नितीन घोडके, सहाय्यक प्रशासन अधिकारी सामान्य प्रशासन विभागकार्यक्रमास जिल्हा परिषदेचे विविध विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी तसेच पदोन्नती प्राप्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पदोन्नतीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा परिषद प्रशासन अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख होण्यासाठी या पदोन्नतीचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *