ठाणे जिल्ह्यात ‘सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रमाला’ वेग…१० प्रशिक्षण सत्रांत ३७८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम सुरू!
आरोग्य ठाणे न्यूज

ठाणे जिल्ह्यात ‘सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रमाला’ वेग…१० प्रशिक्षण सत्रांत ३७८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम सुरू!

Aug 7, 2026

ठाणे ०७ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care – CPHC) प्रशिक्षण कार्यक्रमाची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत १० प्रशिक्षण सत्रे पूर्ण झाली आहेत. या सत्रांमध्ये एकूण ३७८ अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी नियोजित प्रशिक्षण सत्रे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत.आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कार्यरत आयुष्मान आरोग्य मंदिरांमधील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच आवश्यक प्राथमिक आरोग्य सेवा मिळावी, तसेच विविध आजारांचे वेळेत निदान, उपचार व व्यवस्थापन प्राथमिक स्तरावरच करता यावे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

ठाणे जिल्ह्यातील आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), सहाय्यक परिचारिका प्रसूतीका (ANM), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) तसेच आशा स्वयंसेविकांच्या ज्ञान, कौशल्य व कार्यक्षमतेत वाढ करण्यावर प्रशिक्षणामध्ये विशेष भर देण्यात येत आहे. माता व बाल आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, वृद्धांची आरोग्य सेवा, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक आरोग्य, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, योग व आयुष उपचार पद्धती, आरोग्य प्रोत्साहन आणि रोगप्रतिबंधक उपाययोजना आदी विषयांवर सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले जात आहे.प्रशिक्षणामध्ये केस स्टडी, गटचर्चा, प्रश्नोत्तर सत्रे तसेच प्रत्यक्ष आरोग्य सेवा परिस्थितींवर आधारित मार्गदर्शनाचा समावेश असल्याने प्रशिक्षणार्थींना दैनंदिन कामकाजात त्याचा प्रभावी उपयोग करता येणार आहे.

रुग्णांची योग्य तपासणी, आजारांची प्राथमिक अवस्थेत ओळख, उच्च जोखमीच्या रुग्णांची वेळेत नोंद, आवश्यक संदर्भसेवा, उपचारांचे सातत्य आणि आरोग्यविषयक समुपदेशन याबाबतही प्रशिक्षण देण्यात येत आहे.ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे, ता. कल्याण येथून या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण ५० प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामधून सुमारे २ हजार अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.प्राथमिक स्तरावरच नागरिकांच्या बहुतांश आरोग्य गरजा पूर्ण करण्याची क्षमता वाढल्याने अनावश्यक संदर्भसेवा कमी होण्यास, गंभीर व उच्च जोखमीच्या रुग्णांची वेळेत ओळख होण्यास तसेच आवश्यक रुग्णांना योग्य वेळी उच्चस्तरीय आरोग्य संस्थेकडे संदर्भित करण्यास मदत होणार आहे.

परिणामी नागरिकांना वेळेत आणि त्यांच्या परिसरात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या नियोजन व समन्वयातून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांचीही प्रशिक्षणाच्या नियोजन व अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका आहे.“ठाणे जिल्ह्यात सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे सुरू असून आतापर्यंत १० प्रशिक्षण सत्रांमध्ये ३७८ अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

प्राथमिक आरोग्य स्तरावरच नागरिकांना अधिक दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य अद्ययावत करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणामुळे आयुष्मान आरोग्य मंदिरांमधील सेवा अधिक सक्षम होतील आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळेल,” असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *