माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाचे समन्स; १५ वर्षे जुन्या प्रकरणात ५ ऑगस्टला कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश!
महाराष्ट्र राजकारण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाचे समन्स; १५ वर्षे जुन्या प्रकरणात ५ ऑगस्टला कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश!

Jul 30, 2026

कल्याण दि.३०: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. कल्याण न्यायालयाने २००९ मधील एका प्रकरणात ठाकरे यांना समन्स बजावले असून, ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

२००९ च्या निवडणुकीतील ‘तो’ व्हिडिओ ठरला वादग्रस्त:

मिळालेल्या माहितीनुसार, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे अशी लढत झाली होती. या निवडणूक प्रचारादरम्यान डोंबिवलीतील एका जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे हे कार्यकर्त्यांना पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांची पर्वा न करता काम करण्याचे सांगत असल्याचा दावा करण्यात आला होता.

बदनामीचा आरोप अन् कायदेशीर लढाई
वसंत डावखरे यांनी मात्र हा व्हिडिओ बनावट (मॉर्फ्ड) असल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले होते. आपली बदनामी करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ एडिट करून वापरल्याचा आरोप करत डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दरम्यान, तक्रारदार वसंत डावखरे यांचे निधन झालेले असल्याने या प्रकरणाची पुढील दिशा काय असेल, याबद्दल उत्सुकता आहे. आता येत्या ५ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे स्वत: न्यायालयात हजर राहतात की वकिलांमार्फत आपली बाजू मांडतात, तसेच यावर डावखरे कुटुंब काय भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *