मुंबई ०४ : ज्येष्ठ शिक्षणसम्राट, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे खालावली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सतेज पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या या अकस्मात निधनाने शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण महाराष्ट्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९५७ मध्ये कोल्हापूरचे महापौर म्हणून केली होती. त्यानंतर १९६७ आणि १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. पुढे त्यांच्या प्रदीर्घ राजकीय व सामाजिक अनुभवाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांची त्रिपुरा आणि बिहार राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती.
१९७८ च्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी राजकीय परिघाबाहेर पडत वयाच्या ४५ व्या वर्षी एका नव्या ध्येयाची सुरुवात केली. “संस्था उभारणीतूनच समाज घडतो” या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात पदार्पण केले. १९८३ मध्ये नवी मुंबईत ‘रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (RAIT) या पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना करून त्यांनी बहुजन व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा खुली केली. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या ‘डी. वाय. पाटील ग्रुप’ अंतर्गत ७ पेक्षा जास्त अभिमत व खाजगी विद्यापीठे आणि १५० हून अधिक शैक्षणिक व आरोग्य संस्था अविरत कार्यरत आहेत.
त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवलेले आहे. त्यांच्या निधनाने एका उत्तुंग, कार्यतत्पर आणि दूरदृष्टी असलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे.
