स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी; महापौर रितू तावडे यांच्या ई-मेलवर धमकीचा मेसेज!
ताज्या बातम्या न्यूज

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी; महापौर रितू तावडे यांच्या ई-मेलवर धमकीचा मेसेज!

Aug 7, 2026

मुंबई ०७ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दहशतावादी हल्ल्याची धमकी देणारा ईमेल मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेलवर प्राप्त झाला आहे. १५ ऑगस्टपूर्वी शहरातील महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजार (स्टॉक मार्केट) यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी या मेलद्वारे देण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या ईमेलमध्ये काही खालिस्तान समर्थकांच्या नावांचाही समावेश आहे. मात्र, हा ईमेल नेमका कोणी पाठवला आहे याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही.

या धक्कादायक प्रकारानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून त्यांनी तातडीने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मेट्रोने प्रवास करणारे नागरिक आणि शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांच्या पालकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, महापौरांना अशा प्रकारची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी १० जून रोजीसुद्धा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुख्यमंत्री कार्यालय आणि बीएमसी इमारतीसह इतर ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचा धमकीचा मेल आला होता. त्यावेळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता, परंतु तपासाअंती तो मेल अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. सध्या पोलीस या नव्या धमकीच्या मेलची सत्यता तपासत असून संशयितांचा शोध घेत आहेत!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *