धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi: “धर्मेंद्र प्रधान यांनी कधीच शिक्षण खातं चालवलं नाही, ते फक्त RSS ने चालवलं. देशातील विद्यापीठांचा प्रत्येक कुलगुरू हा RSS चा माणूस असल्याचा अत्यंत गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी पेपरफुटीशी संबंधित ‘सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक, 2026’ वर लोकसभेत बोलतांना अत्यंत आक्रमक पद्धतीने भाजपवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी आज भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती प्रहार केला. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या अत्याचारावरून राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला. त्यांनीच विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला. यानंतर संसदेमध्ये अभूतपूर्व गदारोळ उडाला. या संदर्भात पुरावे देण्याची मागणी संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी केली. संसदेमध्ये झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे संसदेचं कामकाज दुपारी अर्ध्या तासासाठी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
धर्मेंद्र प्रधान हे कधीच शिक्षण मंत्रालय चालवत नव्हते. जी व्यक्ती आणि संघटना शिक्षण खातं चालवत होती, ती फक्त RSS होती. भारतातील सर्व विद्यापीठांचा कुलगुरू हा RSS चा माणूस आहे. त्यामुळे तुमचा खरा शत्रू हा धर्मेंद्र प्रधान नसून हा RSS असल्याचं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी सांगितलं की, मुलांच्या पालकांना भाजपसमोर उभं राहण्याची हिंमत होत नव्हती, मात्र तरीही या हिंमतवान मुलांनी यांच्यासमोर उभं राहण्याचं धाडस दाखवलं. या देशाचा जो गृहमंत्री, तथाकथित गृहमंत्री आहे, त्याची हिंमत नाही की संसदेत येऊन बसेल. गृहमंत्री थरथरत आहेत म्हणूनच ते संसदेत आलेले नाहीत, असा आरोप करताच संसदेमध्ये सत्ताधाऱ्यांकडून गदारोळ करण्यात आला.
अंधभक्त आणि इडियटवरूनही गदारोळ:-
राहुल गांधी यांनी ‘अंधभक्त’वरून केलेल्या व्याख्येवरूनसुद्धा सत्ताधारी सदस्यांनी गदारोळ घालत त्यांना भाषणापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी राहुल गांधी यांनी आपला संताप व्यक्त केला. जर अशा पद्धतीने भाजपच या देशामध्ये बोलणार असेल, तर मी संसदेमध्ये शांत बसतो, असे ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सत्ताधाऱ्यांना आवाहन करत राहुल गांधी यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं आवाहन केलं. मात्र, राहुल गांधी यांनी एका विद्यार्थ्यांनं सांगितलेली गोष्ट सांगताना ‘इडियट’ या शब्दाचा उल्लेख केला. या ‘इडियट’ शब्दावरूनही प्रचंड गदारोळ उडाला. त्याचबरोबर त्यांनी अंधभक्तांची व्याख्या करतानाही केलेल्या प्रयोगावरून सत्ताधाऱ्यांना चांगलाच राग अनावर झाल्याचं दिसून आलं!
