Teen Hath Naka: तीन हात नाक्यावरील वाहतूक कोंडीचा शेवट? २०० कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न!
ठाणे तीन हात नाका महाराष्ट्र वाहतूक विकास

Teen Hath Naka: तीन हात नाक्यावरील वाहतूक कोंडीचा शेवट? २०० कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न!

Jul 29, 2026

ठाणे २९ : ठाण्यातील तीन हात नाका चौकातील दीर्घकाळापासूनची वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सुधारणा प्रकल्पाला अखेर सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी सुमारे २०० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे चौकातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.यावेळी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजनही करण्यात आले. इंदिरानगर रूपादेवीपाडा जलपुरवठा योजना, विविध रस्ते विकासकामे तसेच यशवंत रामा साळवी आंतरराष्ट्रीय तरणतलाव व क्रीडा संकुलाच्या कामांचा यात समावेश होता.

मुख्यमंत्री असताना मंजूर झालेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात आकार घेत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे तीन हात नाक्यावरील सात प्रमुख वाहतूक मार्गांपैकी चार मार्ग सिग्नलमुक्त होतील. त्यामुळे वाहनांची ये-जा अधिक वेगाने होईल आणि नागरिकांचा वेळ तसेच इंधनाची बचत होईल. हा प्रकल्प पुढील दीड वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विकासकामांची पायाभरणी:-

इंदिरानगरसाठी ३१ एमएलडी आणि रूपादेवीपाड्यासाठी २१ एमएलडी अशी एकूण ५२ एमएलडी पाणीपुरवठा क्षमता निर्माण करण्यात आली आहे. तसेच, रूपादेवी मंदिर परिसरातील मुलांसाठीचे मैदान कायम खुले ठेवण्यात येईल आणि त्या जागेवर कोणतेही बांधकाम होणार नाही, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूपादेवी मंदिर परिसर व हँगिंग गार्डनच्या सुशोभीकरणासाठी ३० कोटी रुपयांची घोषणा केली. यावेळी यशवंत रामा साळवी आंतरराष्ट्रीय तरणतलाव आणि क्रीडा संकुलाचे भूमिपूजनही करण्यात आले. कार्यक्रमाला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:-

युरोपीय तज्ज्ञांच्या सहकार्याने हा प्रकल्प विकसित करण्यात येणार असून, भूमिगत पाणी, गॅस आणि इंधन वाहिन्यांचे सविस्तर मॅपिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे काम सुरू असतानाही वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल. सिग्नलवर वाहनांना जास्तीत जास्त १५ सेकंदांचा विलंब होईल अशी योजना आखण्यात आली आहे.यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे कोस्टल रोड आणि इस्टर्न फ्रीवे विस्तारालाही गती देण्याचे निर्देश दिले. खेडा नगर ते आनंद नगर, साकेत, गायमुख आणि फाउंटन हॉटेलमार्गे उन्नत मार्ग उभारण्याची योजना असून, त्यामुळे अहमदाबाद, जेएनपीटी आणि मुंबईकडून येणारी अवजड वाहने शहरातील अंतर्गत रस्त्यांऐवजी पर्यायी मार्गाने वळवता येणार आहेत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *