नवी दिल्ली ३१ : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आक्रमक नेते शहझाद पूनावाला यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असल्याचे वृत्त समोर आले आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूनावाला यांनी वैयक्तिक कारणास्तव आपला राजीनामा भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे सादर केला आहे.
पूनावाला यांनी आपल्या ‘X’ (ट्विटर) वरील अकाऊंटच्या बायोमधून ‘भाजपा’ या शब्दाचा उल्लेख हटवून त्याऐवजी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आजीवन समर्थक’ असा बदल केला आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याच्या चर्चांनी वेग घेतला आहे.तथापि, पूनावाला यांच्या राजीनाम्याबाबत अथवा पक्षातील त्यांच्या भूमिकेबाबत अद्याप भाजपाकडून किंवा स्वतः शहझाद पूनावाला यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. ते लवकरच याप्रकरणी आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून करणाऱ्या शहझाद पूनावाला यांनी २०१७ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. व्यवसायाने वकील असलेल्या पूनावाला यांनी आपल्या स्पष्टवक्त्या शैलीमुळे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून ओळख निर्माण केली आहे!
