नवी दिल्ली ०२ : राजधानी दिल्लीत रविवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार घडताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पप्पू यादव हे थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे.सायंकाळी सुमारे सहा वाजता सुरू असलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान एक व्यक्ती चाकू घेऊन आत शिरल्याचे सांगितले जात आहे. त्याने पप्पू यादव यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा कर्मचारी आणि उपस्थितांनी वेळीच त्याला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर माध्यमांशी बोलताना पप्पू यादव यांनी गंभीर आरोप केला. “माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता.
हल्लेखोर नियोजनबद्ध पद्धतीने चाकू घेऊन पत्रकार परिषदेत आला होता,” असा दावा त्यांनी केला. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पप्पू यादव यांनी संसद भवनाबाहेर राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावर अनोखे आंदोलन केले होते. साधूचा वेश परिधान करून त्यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांसह निदर्शनात सहभाग घेतला होता. यावेळी खासदारांच्या हातात दानपेट्या होत्या आणि या आंदोलनाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. आता त्यानंतर झालेल्या या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे!
