माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत ऑगस्ट महिन्यात विविध आरोग्य जनजागृती उपक्रमांचे आयोजन…कुष्ठरोग, नेत्ररोग व हत्तीरोग प्रतिबंधासाठी विशेष मोहीम; नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव!
ठाणे, दि. ०६ (जिल्हा परिषद, ठाणे) : महाराष्ट्र शासनाच्या “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात माहे ऑगस्ट २०२६ दरम्यान विविध आरोग्यविषयक जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, रोगनियंत्रण कार्यक्रम तसेच ग्रामस्तरावरील आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक गाव स्वच्छ, निरोगी, रोगमुक्त आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम व्हावे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असून ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.
ही मोहीम जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत सर्व तालुक्यांमध्ये नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्यात येत आहे.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले, “निरोगी गाव हेच सक्षम आणि समृद्ध समाजाचे आधारस्थान आहे. ‘माझं गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, जनजागृती आणि वेळेवर उपचार पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामपंचायत, आरोग्य यंत्रणा आणि ग्रामस्थ यांच्या सामूहिक सहभागातून हे अभियान अधिक प्रभावी होईल. प्रत्येक नागरिकाने आरोग्य तपासणी, लसीकरण, स्वच्छता आणि रोगप्रतिबंधक उपायांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या गावाला आरोग्यदृष्ट्या सक्षम बनवावे.”
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की, या अभियानाअंतर्गत रोगांचे लवकर निदान, जनजागृती, नियमित आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार आहे. गावागावांत आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधून आरोग्यविषयक माहिती दिली जाणार असून संशयित रुग्णांची वेळेत तपासणी व उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे.
ऑगस्ट २०२६ मधील प्रमुख उपक्रम
१. तालुकास्तरीय ‘आरोग्य संपन्न गाव’ कृती दल समिती बैठक
सर्व तालुक्यांमध्ये कृती दल समितीच्या बैठका आयोजित करून अभियानाचा आढावा, आरोग्यविषयक उद्दिष्टे, प्रगती तसेच विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे.
२. ग्रामपंचायतस्तरीय कृती दल समिती बैठक
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये समितीची बैठक घेऊन गावातील आरोग्यविषयक प्रश्न, स्वच्छता, पोषण, माता-बाल आरोग्य, लसीकरण, संसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध आणि जनजागृती कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे.
३. कुष्ठरोग जनजागृती व संशयित रुग्णांचा सक्रिय शोध
कुष्ठरोग हा पूर्णपणे उपचारयोग्य आजार असून वेळेवर निदान व उपचार झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्वचेवर न खाज येणारे, न दुखणारे बधीर चट्टे, संवेदनाशून्य डाग, हात-पाय सुन्न होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून उपचार सुरू करावेत. समाजातील कुष्ठरुग्णांबाबत कोणताही भेदभाव न करता त्यांना सन्मानाने वागणूक देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
४. नेत्ररोग जनजागृती अभियान (२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२६)
या कालावधीत मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टीदोष, मधुमेहामुळे होणारे नेत्रविकार तसेच डोळ्यांच्या आरोग्याबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे. विशेष तपासणी शिबिरे, मार्गदर्शन कार्यक्रम आणि आवश्यकतेनुसार उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांनी नियमित नेत्रतपासणी करून आवश्यक उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
५. १६ ते ३१ ऑगस्ट – हत्तीरोग (फायलेरिया) शोध मोहीम
या कालावधीत हत्तीरोगाच्या संशयित रुग्णांचा सक्रिय शोध घेऊन त्यांची तपासणी, निदान व उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. पाय किंवा हाताला असामान्य सूज, वारंवार ताप किंवा इतर संबंधित लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
या अभियानाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आरोग्य विभागाला सक्रिय सहकार्य करावे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य कर्मचारी आपल्या घरी भेट देत असल्यास त्यांना आवश्यक माहिती द्यावी. वेळेवर आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार घ्यावेत तसेच स्वच्छता, संतुलित आहार, नियमित व्यायाम, लसीकरण आणि रोगप्रतिबंधक उपायांचा अवलंब करून आपल्या गावाला “आरोग्य संपन्न गाव” बनविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा.
ठाणे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कटिबद्ध असून, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून निरोगी, स्वच्छ आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम समाज घडविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
