Mumbai ११: मुंबईत एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई: बनावट दूध रॅकेट उद्ध्वस्त, ब्लिंकिटचे गोदाम सील!
अन्न सुरक्षा मुंबई

Mumbai ११: मुंबईत एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई: बनावट दूध रॅकेट उद्ध्वस्त, ब्लिंकिटचे गोदाम सील!

Aug 11, 2026

मुंबई ११ : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीए आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-१२ ने मुंबईत धडक कारवायांचा धडाका सुरू ठेवला आहे. दहिसर पूर्व परिसरात बनावट दूध तयार करणाऱ्या टोळीवर कारवाई करत अमूल आणि गोकुळसारख्या नामांकित कंपन्यांच्या नावाने सुरू असलेल्या दूध भेसळीचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईदरम्यान नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्या कापून त्यातील दूध काढून त्यात अस्वच्छ पाणी मिसळले जात होते, आणि पिशव्या पुन्हा सील करून अस्सल दूध असल्याचा भासवत विक्री केली जात होती.

या प्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.या कारवाईत अमूल आणि गोकुळच्या नावाने तयार केलेला सुमारे ४७० लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा, अमूल कंपनीच्या १३ हजार बनावट रिकाम्या पिशव्या, प्लास्टिक साहित्य, सुमारे १० लाख रुपये किमतीची मशिनरी आणि ४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तपासात ही टोळी दरमहा सुमारे ३०,००० पाऊच याप्रमाणे आतापर्यंत अंदाजे २० लाख पाऊच (दूध पिशव्या) विक्री केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तपासाची पाळेमुळे शोधत पोलिसांनी वसई पूर्व (पालघर) येथील बनावट दूध पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला आणि मुख्य आरोपीला तेलंगणातून ताब्यात घेऊन संपूर्ण यंत्रणा उद्ध्वस्त केली.

मुख्य आरोपी २०२१ पासून मुंबई व उपनगरात बनावट दूध पिशव्या तयार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.दुसऱ्या एका कारवाईत एफडीएने मालाड येथील ‘ब्लिंकिट’च्या गोदामावर धाड टाकली. ७ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या या तपासणीत गोदामात अत्यंत अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव, मुदतबाह्य अन्नपदार्थ, उंदरांच्या नियंत्रणाचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचा अभाव आढळून आला. या गंभीर त्रुटींमुळे ब्लिंकिटचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला असून, निलंबन कालावधीत विक्री किंवा व्यवसाय सुरू ठेवल्यास कडक कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *