Ayodhya Ram Mandir : निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी साधू-संत आक्रमक; पंतप्रधान निवासस्थानाकडे काढला मोर्चा!
ताज्या बातम्या न्यूज

Ayodhya Ram Mandir : निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी साधू-संत आक्रमक; पंतप्रधान निवासस्थानाकडे काढला मोर्चा!

Aug 11, 2026

राममंदिर दानचोरी प्रकरण ११ : राममंदिरातील कथित दानचोरी प्रकरणाचे पडसाद आता तीव्र होताना दिसत असून, या घटनेमुळे देशभरातील हजारो हिंदू बांधवांमध्ये आणि साधू-संतांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. या चोरी प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, या मुख्य मागणीसाठी सुमारे ५०० साधू-संतांनी एकत्र येत थेट पंतप्रधान निवासस्थानाकडे मोर्चा काढला. यावेळी पंतप्रधानांना आपल्या मागण्यांचे निवेदन सोपवण्याच्या उद्देशाने संतांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता.दरम्यान, पंतप्रधान निवासस्थानाच्या दिशेने पुढे जाणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी वाटेतच रोखले. पोलिसांनी अटकाव केल्यानंतर संत-महंतांनी थेट रस्त्यावरच ठिय्या मांडला, तर काही जण रस्त्यावरच झोपून आपला विरोध दर्शवू लागले.

राममंदिरासारख्या पवित्र ठिकाणी झालेल्या दानचोरीमुळे सनातन धर्माची मोठ्या प्रमाणावर बदनामी होत असल्याचा गंभीर आरोप संतांनी केला आहे. या प्रकरणाची सीबीआय (CBI) द्वारे सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. तसेच जर या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली गेली नाही, तर चित्रकूट ते अयोध्या अशी ‘चंदाचोरी ते से आस्था बचाव यात्रा’ काढण्याचा इशाराही संतांनी यावेळी दिला. सध्या या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी सुरू आहे.

मात्र, घटनेला दोन महिने उलटूनही यातील मुख्य आरोपी किंवा कोणताच ‘बडा मासा’ तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे असंतोष अधिकच वाढला आहे. आधीच विरोधकांनी संसदेत राम मंदिर चोरीचा मुद्दा लावून धरला असताना, आता थेट साधू-संतांनीच याविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारल्यामुळे राममंदिरातील दानचोरीचा हा विषय पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *