Thane: वर्तकनगर परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगर ते निळकंठ रोड परिसरातील हातगाड्या, पानटपरी, टेबल व शेड हटविले!
ठाणे न्यूज

Thane: वर्तकनगर परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगर ते निळकंठ रोड परिसरातील हातगाड्या, पानटपरी, टेबल व शेड हटविले!

Aug 11, 2026

ठाणे ११: ठाणे शहरातील पदपथ फेरीवालामुक्त करण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या निर्देशानुसार अतिक्रमणविरोधी कारवाई मोहिम सातत्याने सुरू आहे. सोमवारी (10 ऑगस्ट) रात्री उशिरापर्यत वर्तकनगर प्रभाग समितीच कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये गांधीनगर–वसंतविहार सर्कल–काशिनाथ घाणेकर सर्कल ते निळकंठ रोड परिसरात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत चार हातगाड्या, एक पानटपरी, चार लाकडी टेबल आणि 12 लाकडी शेड निष्कासित करण्यात आले असून, हातगाडयांवर कारवाई करण्यात येवून पदपथ नागरिकांसाठी मोकळे करण्यात आले.

शहरातील सर्व पदपथ नागरिकांसाठी मोकळे ठेवावेत यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी मा. सर्वसाधारण सभेत आवाज उठविला होता. फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरुन चालावे लागते. रस्ते आणि पदपथांवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या या व्यावसायिक अतिक्रमणांमुळे नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली.

अतिक्रमण उपायुक्त जितेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईदरम्यान उपआयुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे (परिमंडळ-3), सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी यांच्यासह वर्तकनगर प्रभाग समिती तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.महापालिकेच्या पथकाने 11 एम.एस.एफ. जवान, 14 कामगार, दोन टेम्पो आणि एका जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे हटविली. कारवाईदरम्यान अनधिकृत हातगाड्या, पानटपरी, लाकडी टेबल तसेच शेड हटवून संबंधित परिसर मोकळा करण्यात आला.

वर्तकनगर परिसरातील कारवाईनंतरही संबंधित रस्ते व पदपथांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून दैनंदिन स्तरावर पाहणी व आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे. रस्ते आणि पदपथ फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहीम यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *