Mumbai: शहरांच्या विकासासाठी ब्रिक्स देशांनी अनुभव, तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करावे…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्हची मुंबईत सुरुवात!
ताज्या बातम्या न्यूज मुंबई

Mumbai: शहरांच्या विकासासाठी ब्रिक्स देशांनी अनुभव, तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करावे…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्हची मुंबईत सुरुवात!

Aug 11, 2026

मुंबई, दि. ११: “ब्रिक्स देशांनी एकमेकांना प्रगत तंत्रज्ञान, अनुभव, ज्ञान आणि माहितीचे आदानप्रदान केले पाहिजे. अशा परस्पर सहकार्यातूनच देश जवळ येतील, जागतिक विकासाला खरी गती मिळेल आणि प्रत्येक शहराला शाश्वत विकास साधणे शक्य होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.मुंबईत आयोजित ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६” मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी, लवचिकता, नवकल्पना, सहकार्य आणि शाश्वततेच्या माध्यमातून २१व्या शतकातील नागरिककेंद्रित शहरे उभारण्यासाठी ब्रिक्स देशांतील शहरांनी आपले अनुभव, तंत्रज्ञान आणि नवकल्पना एकमेकांशी सामायिक कराव्यात, असे आवाहन केले.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वरळी येथे या परिषदेचे उद्घाटन झाले. मुंबई फर्स्ट या संस्थेने आयोजित केलेली ही परिषद वरळी येथे दोन दिवस चालणार आहे.शहरे म्हणजे फक्त विटा आणि काँक्रीटच्या रचना नाहीत तर, देशाच्या आर्थिक प्रगतीची ग्रोथ इंजिन्स आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे, तर मोठी संधी म्हणून पाहिले पाहिजे. आजच्या काळात शहरांसमोरील आव्हाने समान असल्याने त्यांचे समाधानही सीमांच्या पलीकडे जाऊन शोधावे लागेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. विशेष म्हणजे संत तुकाराम महाराज यांच्या ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’या उक्तीचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ब्रिक्स देशांतील शहरांनी परस्पर सहकार्याने विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचे आवाहन केले.

या परिषदेत ब्रिक्स देशांतील शहरांचे प्रतिनिधी, महापौर, नगर नियोजन तज्ज्ञ, शहरी विकास क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत.मुंबई ही भारताच्या आकांक्षांची राजधानी असून मेहनतीचा सन्मान, विविधतेचा आदर आणि संकटांशी सामना करण्याची जिद्द अशी या शहराची ओळख आहे असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अशा जागतिक दर्जाच्या मुंबईत ब्रिक्स परिषदेचे आयोजन होणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. विविध देशांतील शहरांनी एकमेकांकडून शिकावे, आपले अनुभव सामायिक करावेत आणि भविष्यातील भागीदारीला नवी दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.शहरीकरण समस्या नव्हे तर संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे, तर मोठी संधी म्हणून पाहण्याचा विचार मांडला आहे. आज जगातील प्रत्येक मोठ्या शहरासमोर वेगाने होणारे शहरीकरण, हवामान बदल, पूर, उष्णतेच्या लाटा, वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी व्यवस्थापन आणि परवडणारी घरे ही समान आव्हाने आहेत.

त्यामुळे या आव्हानांवरील उपाययोजनांसाठी देशांच्या सीमांपलीकडे जाऊन परस्पर सहकार्य आणि अनुभवांची देवाणघेवाण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.नागरिकांचे जीवनमान केंद्रबिंदू शहरांचा विकास केवळ उंच इमारती किंवा आकर्षक ‘स्कायलाइन’पुरता मर्यादित नसावा. नागरिकांचा प्रवास सुलभ होणे, त्यांना सुरक्षित घरे मिळणे, स्वच्छ हवा मिळणे, मुलांसाठी चांगल्या भविष्याच्या संधी निर्माण होणे आणि आपत्तीच्या काळात प्रशासनाने ठामपणे नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे, हेच यशस्वी शहरी नियोजनाचे खरे मापदंड आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. शहरी विकास हा नागरिकांच्या सन्मानाशी आणि त्यांच्या भविष्यातील संधींशी जोडलेला असला पाहिजे, असे स्पष्ट केले.

महाराष्ट्र शाश्वत शहरी विकास, सक्षम पायाभूत सुविधा, डिजिटल गव्हर्नन्स आणि हवामान बदलाच्या दृष्टीने पाउले उचलत आहे असेही ते म्हणाले.महाराष्ट्रातील शहरांच्या विकासाला नवी गती…मुंबईपासून नागपूरपर्यंत, पुण्यापासून नाशिकपर्यंत तसेच ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्रातील शहरांमध्ये मेट्रो, रस्ते, ड्रेनेज, पुनर्विकास, परवडणारी घरे, डिजिटल सेवा, हरित पायाभूत सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांना नवी गती देण्यात येत आहे. या सर्व विकासामागील मुख्य उद्देश नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा आहे. समान संधी, सेवांची सुलभ उपलब्धता, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मनात निर्माण होणारा विश्वास यामध्येच सर्वसमावेशक विकासाचे खरे यश आहे.

विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पुढील पिढ्यांसाठी नव्या संधी निर्माण करणारा असला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.हवामान बदलासाठी महाराष्ट्र सज्ज… मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरासाठी हवामान बदल हे गंभीर आव्हान असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समुद्राच्या पातळीत वाढ, पुराचा धोका आणि वाढते उष्णतामान यांचा नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच शहराच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पूर नियंत्रण, किनारपट्टी संरक्षण, हरित क्षेत्रवाढ, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, शाश्वत वाहतूक आणि तंत्रज्ञानाधारित नियोजन या क्षेत्रांत ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ब्रिक्स देशांतील शहरांकडे सार्वजनिक वाहतूक, डिजिटल गव्हर्नन्स, आपत्ती व्यवस्थापन, हरित वित्तपुरवठा आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. विविध जागतिक शहरांमध्ये डिजिटल ट्वीन टेक्नोलॉजी, एआय आधारित वाहतूक व्यवस्थापन, आणि स्मार्ट गव्हर्नन्स यांसारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत आहे.

या सर्व अनुभवांना एका व्यासपीठावर आणणे ही भविष्यातील शहरांच्या विकासासाठी मोठी संधी असल्याचे ते म्हणाले.शहरांनी एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी सहकार्य आणि सक्षमीकरणावर भर दिला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र गुंतवणूक, उद्योग आणि नवकल्पनांसाठी सज्ज..महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह, उद्योगांसाठी सक्षम, नवकल्पनांसाठी खुले आणि सहकार्यासाठी सदैव तत्पर आहे, असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी शहरे ही केवळ प्रशासकीय सीमा नसून नवकल्पनांच्या प्रयोगशाळा आणि शाश्वत विकासाची इंजिने आहेत. त्यामुळे शहरांच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *