जिल्हा परिषद ठाणे व Union Bank of India यांच्यात सामंजस्य करार; अधिकारी-कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्यासह विविध आर्थिक सुविधांचा लाभ…आर्थिक साक्षरतेसाठीही जिल्हा परिषद पुढाकार घेणार!
न्यूज

जिल्हा परिषद ठाणे व Union Bank of India यांच्यात सामंजस्य करार; अधिकारी-कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्यासह विविध आर्थिक सुविधांचा लाभ…आर्थिक साक्षरतेसाठीही जिल्हा परिषद पुढाकार घेणार!

Aug 13, 2026

ठाणे दि. १३ (जिल्हा परिषद, ठाणे) : जिल्हा परिषद, ठाणे आणि Union Bank of India यांच्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक सुविधा तसेच आरोग्य विमा आणि इतर लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. बी. जे. हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात हा सामंजस्य करार पार पडला.या सामंजस्य कराराच्या माध्यमातून जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतन खात्याच्या अनुषंगाने विविध आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य विम्यासह कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन विविध बँकिंग व आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर, कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, बांधकाम विभाग प्रमुख दिपाली घोरपडे, समाजकल्याण विभाग प्रमुख उज्ज्वला सपकाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय विभागप्रमुख, संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडून श्री अमित भाटिया डीजीएम प्रादेशिक कार्यालय ठाणे व श्री सावन शिव एजीएम हे उपस्थित होते.जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतन खात्याच्या माध्यमातून अधिकाधिक चांगल्या आर्थिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून विविध बँकांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

आरोग्य विमा तसेच इतर आर्थिक लाभांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीनेही फायदा होणार आहे.बँकिंग सुविधांचा लाभ घेताना कर्मचाऱ्यांना योग्य आर्थिक नियोजन, बचत, गुंतवणूक आणि उपलब्ध आर्थिक पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठीही जिल्हा परिषद पुढाकार घेणार आहे.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, आर्थिक गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन हे प्रत्येकाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतन खात्याच्या माध्यमातून चांगल्या आर्थिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बँकांच्या विविध योजनांची माहिती यापुढेही जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल.

तसेच, केवळ आर्थिक सुविधा उपलब्ध करून देणे पुरेसे नसून अधिकारी-कर्मचाऱ्यांना बचत, गुंतवणूक, विमा, आर्थिक नियोजन आणि विविध आर्थिक साधनांचा योग्य पद्धतीने वापर याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत आर्थिक साक्षरतेसाठी आवश्यक उपक्रम राबविण्याचा पुढाकार घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.या सामंजस्य करारामुळे जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांसोबतच भविष्यातील आर्थिक नियोजनासाठीही विविध पर्याय उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कर्मचारी हिताच्या दृष्टीने अशा प्रकारच्या उपक्रमांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येत असून, भविष्यातही अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त आर्थिक व कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सूचनेनुसार वित्त विभागाद्वारे सर्व कर्मचाऱ्यांना वेतन खाते सुविधा अंतर्गत आयुर्विमा, अपघात विमा, वैद्यकीय विमा छत्र उपलब्ध करण्यासाठी सर्वच राष्ट्रीयकृत बँक तसेच इतर बँकासमवेत चर्चा करून अशा प्रकारचे सामंजस्य करार करण्याचा प्रयत्न असल्याचे श्री वैजनाथ बुरडकर मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांनी यावेळी सांगितले.जिल्हा परिषद प्रशासन आणि Union Bank of India यांच्या सहकार्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यास तसेच त्यांना योग्य आर्थिक पर्यायांची निवड करण्यास मदत होणार आहे. या सामंजस्य कराराचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *