Thane:आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त साकेत महाविद्यालयात जनजागृती रॅली व रेड रन स्पर्धा उत्साहात संपन्न!
ठाणे १३ : ठाणे जिल्ह्यातील ६० महाविद्यालयांमधील २२१ विद्यार्थ्यांचा रेड रन स्पर्धेत सहभाग; ४५० जणांच्या सहभागातून HIV/AIDS प्रतिबंधाबाबत जनजागृती*ठाणे, दि. १३ (जिल्हा परिषद, ठाणे) : आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून तसेच “इंटेन्सिफाईड आयसीटीसी कॅम्पेन” अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली साकेत महाविद्यालय, कल्याण येथे जिल्हास्तरीय “रेड रन स्पर्धा” आणि जनजागृतीपर रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. युवा वर्गामध्ये HIV/AIDS प्रतिबंध, सुरक्षित वर्तन, नियमित HIV तपासणी, उपचाराची उपलब्धता तसेच HIV संदर्भातील गैरसमज दूर करण्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
युवक हा समाजातील परिवर्तनाचा महत्त्वाचा घटक असून, आरोग्यविषयक योग्य माहिती आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा, जनजागृती आणि सामाजिक सहभाग यांचा प्रभावी संगम साधत रेड रन स्पर्धा व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.*६० महाविद्यालयांतील २२१ स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग*जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धेला ठाणे जिल्ह्यातील ६० महाविद्यालयांमधून एकूण २२१ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. युवकांमध्ये HIV/AIDS प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच निरोगी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला.स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम क्रमांक मो. अदिल रहींन – एस.एस.टी. महाविद्यालय, द्वितीय क्रमांक अमन यादव – साकेत महाविद्यालय आणि तृतीय क्रमांक रोहित सांगा – साकेत महाविद्यालय यांनी मिळविला.
मुलींच्या गटात प्रथम क्रमांक मनिषा राठोड – एस.एस.टी. महाविद्यालय, द्वितीय क्रमांक तृप्ती भोईर – एस.एस.टी. महाविद्यालय आणि तृतीय क्रमांक सुजाता मांडेकर – एस.एस.टी. महाविद्यालय यांनी पटकावला.विजेत्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या उत्स्फूर्त सहभागातून युवकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.*४५० जणांच्या सहभागातून जनजागृतीपर रॅली*रेड रन स्पर्धेनंतर विविध महाविद्यालये, संस्था तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये एकूण सुमारे ४५० जण सहभागी झाले.रॅलीदरम्यान HIV/AIDS प्रतिबंध आणि नियंत्रणाबाबत विविध घोषवाक्ये, संदेश आणि जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. नियमित HIV तपासणी करणे, सुरक्षित वर्तनाचा अवलंब करणे, HIV संदर्भातील योग्य माहिती घेणे, आवश्यकतेनुसार वेळेत उपचार घेणे तसेच HIV बाधित व्यक्तींविषयी असलेले गैरसमज व भेदभाव दूर करणे याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला.HIV संदर्भातील भीती, गैरसमज आणि सामाजिक कलंक दूर करून HIV बाधित व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने स्थान मिळावे, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशील भूमिका घेणे आवश्यक आहे, हा संदेशही रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
युवकांमध्ये आरोग्यविषयक जबाबदारीची जाणीव
आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश युवकांना HIV/AIDS प्रतिबंध आणि आरोग्यविषयक विविध बाबींविषयी शास्त्रीय व अचूक माहिती उपलब्ध करून देणे हा होता. युवकांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्यासोबतच आपल्या मित्र-मैत्रिणी, कुटुंब आणि समाजामध्येही योग्य माहिती पोहोचवावी, यासाठी या उपक्रमातून प्रेरणा देण्यात आली.रेड रनसारख्या क्रीडा उपक्रमातून युवकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळवून त्यांच्यापर्यंत आरोग्यविषयक संदेश पोहोचविणे तसेच जनजागृती रॅलीच्या माध्यमातून हा संदेश व्यापक समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे मा. डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय ठाणे डॉ. मृणाल राहुड, साकेत ज्ञानपीठ शिक्षण संस्था, कल्याणच्या सीईओ शोभा नायर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शहरी क्षयरोग अधिकारी डॉ. पौर्णिमा दहाके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रतन गाढवे, जिल्हा समन्वयक, NSS जीवन विचारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
तसेच साकेत विद्यामंदिरच्या प्रभारी प्राचार्य डॉ. प्रसिना बिजू, साकेत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या प्रा. ममता सिंग, संचालक प्रमोद तिवारी, साकेत कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्रा. सनोज कुमार, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य विद्या प्रकाश मौर्य, साकेत कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्रा. पद्मज्या कदम, NSS कार्यक्रम अधिकारी संजय चौधरी, जिल्हा पर्यवेक्षक अशोक देशमुख आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या जिल्हा पर्यवेक्षिका निलीमा अनिल पाटील उपस्थित होते.यावेळी साकेत महाविद्यालयाचे प्राचार्य, विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जनजागृतीतून HIV/AIDS मुक्त समाजाच्या दिशेने वाटचालHIV/AIDS प्रतिबंधासाठी केवळ आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करणे पुरेसे नसून, युवक, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, स्थानिक प्रशासन आणि समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.
या दृष्टीने रेड रन स्पर्धा आणि जनजागृती रॅलीसारखे उपक्रम युवकांना आरोग्यविषयक चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहेत.युवकांनी HIV/AIDS बाबत अचूक माहिती जाणून घेऊन ती समाजात पोहोचवावी, गैरसमज आणि भेदभाव दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच सुरक्षित आणि जबाबदार वर्तनाचा स्वीकार करावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.आरोग्यविषयक जागरूक, संवेदनशील आणि जबाबदार युवा पिढी घडविण्याच्या दृष्टीने साकेत महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेली रेड रन स्पर्धा आणि जनजागृती रॅली हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
