Ambernath: अखेर भाजपा आणि मनसेच्या राड्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल; मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मागणीला यश!
ताज्या बातम्या राजकारण

Ambernath: अखेर भाजपा आणि मनसेच्या राड्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल; मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मागणीला यश!

Aug 16, 2026

अंबरनाथ १६ : अंबरनाथ मध्ये खाजगी मालमत्तेच्या वादातून अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री भाजपा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारातच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला करून तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मनसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यासह ९ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय मात्र पोलीस ठाण्याच्या आवारातच दहशत माजवणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती त्यामुळं पोलीस राजकीय दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला होता.

भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी मनसेने रविवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. अखेर शनिवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांनी भाजपा नगरसेवक अभिजित करंजुळे, पवन वाळेकर यांच्यासह ६ भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलाय.मनसे कार्यकर्ते सुहास घाग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भाजपच्या दोन नगरसेवकांसह ६ जणांवर बेकायदेशीर जमाव, धोकादायक साधनांचा वापर करून मारहाण, दंगल, मालमत्तेचे नुकसान अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच गाडीवर हल्ला करून मनसेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी आता तब्बल चार दिवसानंतर पोलिसांनी भाजपच्या दोन नगरसेवकांसह ६ जणांवर गुन्हा दाखल केलाय त्यामुळं रविवारी होणारा मोर्चा मनसेने तूर्तास स्थगित केलाय. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यावर आंदोलनाची पुढील रूपरेषा आखली जाणार असल्याचं मनसेनं स्पष्ट केलंय!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *