Thane: बदलत असलेल्या ठाणे शहराचा विकास छायाचित्रातून मांडावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे..जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाण्यात छायाचित्र प्रदर्शन; शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार!
ठाणे ताज्या बातम्या न्यूज

Thane: बदलत असलेल्या ठाणे शहराचा विकास छायाचित्रातून मांडावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे..जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाण्यात छायाचित्र प्रदर्शन; शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार!

Aug 17, 2026

ठाणे १७ : छायाचित्र हे केवळ एखाद्या क्षणाचे चित्रण नसून त्या एका छायाचित्रातून हजारो शब्द व्यक्त होत असतात. एखादे चित्र पाहिल्यानंतर त्या घटनेची किंवा प्रसंगाची अनुभूती नागरिकांना येते. तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला जातो. ठाणं बदलतंय.. ठाण्याचा होत असलेला विकास छायाचित्रकारांनी छायाचित्राच्या माध्‍यमातून मांडावा असे नमूद करीत छायाचित्रकाराला त्याचा ‘तिसरा डोळा’ सातत्याने उघडा ठेवावा लागतो, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केले. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका व ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने महापालिका भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झ् निमित्ताने ते बोलत होते.

कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष मीनल संख्ये, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा जयश्री डेव्हिड, वागळे प्रभाग समिती अध्यक्षा एकता भोईर, लोकमान्य-सावरकर प्रभाग समिती अध्यक्षा निर्मला कणसे, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दीपक जाधव, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते(अजित पवार) नजीब मुल्ला, नगरसेवक संजय वाघुले, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे दिलीप शिंदे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी छायाचित्रकारांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. आनंदाचा क्षण असो, दु:खाचा प्रसंग असो किंवा एखादी संकटाची परिस्थिती असो, फोटोग्राफर आपल्या जीवाची पर्वा न करता घटनास्थळी पोहोचून ते क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपत असतो. कोविडच्या कठीण काळातही पत्रकार आणि छायाचित्रकारांनी जीव धोक्यात घालून समाजापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचविण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. फोटोग्राफर हा शब्दांच्या पलीकडे जाऊन व्यक्त होत असतो. एका छायाचित्रातून संपूर्ण घटना किंवा परिस्थिती प्रभावीपणे मांडली जाऊ शकते. मात्र, यासाठी केवळ कॅमेरा हातात असणे पुरेसे नसून योग्य क्षण टिपण्याचे कौशल्य, प्रसंगाचे भान आणि बुद्धीचा योग्य वापर आवश्यक असतो.

काही क्षण पुन्हा कधीच परत येत नाहीत. त्यामुळे योग्य वेळी योग्य क्षण टिपणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने उत्कृष्ट फोटोग्राफर ठरतो, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले. एखादे उत्तम छायाचित्र काढण्यासाठी त्यामागे असलेले निरीक्षण, संयम आणि योग्य टायमिंग अत्यंत महत्त्वाचे असते, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार भगिनींनीही उल्लेखनीय छायाचित्रण केले असल्याचे त्यांनी नमूद केले. फोटोग्राफरला चौफेर नजर ठेवावी लागते.छायाचित्रामध्ये प्रचंड ताकद असते. फोटोग्राफर हा खऱ्या अर्थाने जागरूक नागरिक असतो. अनेक वेळा एखाद्या प्रसंगाचे छायाचित्र टिपताना फोटोग्राफरला संबंधित व्यक्तींच्या रोषालाही सामोरे जावे लागते.

अशा परिस्थितीतही तो आपले काम करत राहतो. त्यामुळे समाजाने फोटोग्राफरच्या कामाकडे समजून घेण्याच्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.*पुढील वर्षी ‘ठाणे बदलतंय’ हा विषय मांडावा*ठाणे शहराचा झपाट्याने विकास होत असून, शहराचे जुने आणि नवे रूप छायाचित्रांच्या माध्यमातून नागरिकांसमोर आणण्याची गरज आहे. पूर्वीचे अरुंद रस्ते आणि आता नव्याने रुंद झालेले रस्ते, बदललेली वाहतूक व्यवस्था, शहरातील वाढत्या सुविधा तसेच ठाण्याच्या विकासाचा प्रवास छायाचित्रांमधून मांडता येऊ शकतो.

त्यामुळे पुढील वर्षी आयोजित करण्यात येणारे छायाचित्र प्रदर्शन ‘ठाणे बदलतंय’ या विषयावर आयोजित करण्यात यावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. जुन्या ठाण्यापासून आधुनिक आणि विकसित ठाण्यापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून नागरिकांसमोर आणल्यास तो एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरेल, असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे महापालिकेच्या शाळांमधील ११ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. त्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा शिंदे यांनी केला.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *