Mumbai – धनुष्यबाण हे चिन्ह हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे देवार्यात ठेवत असत; ते गोठवण्याची उबाठाची मागणी शिवसैनिकांच्या भावना दुखावणारी- मंत्री शंभूराज देसाई!
मुंबई, दि. १९ : धनुष्यबाण हे केवळ निवडणूक चिन्ह नसून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आणि शिवसैनिकांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. बाळासाहेब ठाकरे स्वतः धनुष्यबाण हे चिन्ह देवार्यात ठेवून त्याची पूजा करत असत. अशा पवित्र चिन्हाला गोठवण्याची मागणी करणे म्हणजे लाखो शिवसैनिकांच्या भावनांचा अवमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी अरविंद सावंत यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हासंदर्भातील प्रक्रिया सुरू असताना न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणे अपेक्षित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाची प्रक्रिया आणि न्यायालयीन सुनावणी सुरू असताना अशा प्रकारची मागणी करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी उद्धव ठाकरे गटावर टीका करताना, महाविकास आघाडीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर जाण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप करण्यात आला. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारंवार उल्लेख करणाऱ्या नेत्यांनीच आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणे हे दुटप्पीपणाचे असल्याचेही देसाई यांनी नमूद केले.शिवसेनेच्या वतीने असेही स्पष्ट करण्यात आले की, धनुष्यबाण हे चिन्ह मिळत नसल्याची जाणीव झाल्यामुळेच अशी मागणी पुढे आणली जात आहे.
न्यायालयीन प्रक्रियेचा निकाल येण्यापूर्वीच अशा प्रकारची भूमिका घेणे म्हणजे स्वतःच पराभव मान्य केल्यासारखे आहे.“धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे प्रतीक आहे. लाखो शिवसैनिक आजही या चिन्हाला श्रद्धेने पूजतात. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना भगवा झेंडा आणि धनुष्यबाण कधीही खाली पडू देऊ नका, अशी शिकवण दिली होती. मग हेच चिन्ह गोठवण्याची मागणी कशी केली जाऊ शकते?” असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.अरविंद सावंत यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली असून शिवसेना या भूमिकेचा ठाम निषेध करत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
