Sugar price Hike : सणासुदीच्या काळात साखरेच्या दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांसह व्यापारी आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे लागले होते. साखरेचे भाव शंभर रुपयांच्या पार जाण्याची भीती निर्माण झाल्याने, केंद्र सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी १० लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या आयातीला मंजुरी दिली आहे. देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवणे, बाजारातील संभाव्य टंचाईवर नियंत्रण मिळवणे आणि सणांच्या काळात साखरेचा कृत्रिम तुटवडा किंवा साठेबाजी रोखणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
यासाठी सरकारने साठा मर्यादांवरही विशेष भर दिला आहे.माहितीनुसार, ही कच्ची साखर ब्राझीलसह इतर प्रमुख उत्पादक देशांकडून आयात केली जाणार असून १५ ऑक्टोबरपर्यंत भारतीय बंदरांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या देशात साखरेचा साठा ५४ लाख टन इतका असून विविध राज्यांना दरमहा सरासरी ३ लाख टनाची गरज असते.
आगामी काळात साखरेला असणारी मोठी मागणी विचारात घेऊन पुरवठ्यावर कडक लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच १५ ऑक्टोबरपासून नवीन गाळप हंगाम सुरू करण्याचे नियोजन असल्याने देशांतर्गत उत्पादनातूनही पुरवठा वाढेल. त्यामुळे दिवाळीपूर्वी बाजारात साखरेची आवक सुधारून दरवाढीला आळा बसण्यास मदत होईल!
