Nagpur : नागपुरात क्लोरिन गॅस गळतीमुळे हाहाकार!
ताज्या बातम्या नागपूर

Nagpur : नागपुरात क्लोरिन गॅस गळतीमुळे हाहाकार!

Aug 24, 2026

नागपूर २४ – नागपूरमधील गोधणी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात रविवारी मध्यरात्री १२:१५ वाजताच्या सुमारास अचानक भीषण क्लोरिन गॅस गळती झाली. या गॅसमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांना अचानक दम लागणे, डोळ्यांची जळजळ होणे आणि खोकल्याचा तीव्र त्रास सुरू झाला. या दुर्घटनेत प्रकल्पातील ८ ते १० कर्मचाऱ्यांसह परिसरातील २० ते २५ नागरिक, अशा तब्बल ४० जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाधित ४० जणांपैकी ४ ते ५ नागरिकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असून इतरांवर सामान्य कक्षात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल च्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्रीपासूनच पोलिसांनी परिसरात रेस्क्यू ऑपरेशन राबवून बाधित नागरिकांना रुग्णालयात पोहोचवले व इतरांना सुरक्षित स्थळी हलवले. गॅस न्यूट्रालाइज करण्यासाठी NDRF चे अधिकारी विशेष पीपीई किट घालून ३ ते ४ वेळा प्लांटच्या आत गेले असून गॅस गळती पूर्णपणे निष्प्रभ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.परिस्थितीवर सध्या नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी सुरक्षेचा उपाय म्हणून नागपूर शहर पोलिसांनी ‘फागो पाटील ले-आउट’ आणि ‘नागमंदिर टेकडी’ जवळील २०० मीटरच्या परिसरात नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

पोलिसांनी सकाळी ११:०० वाजेपर्यंत या परिसरात जाणे पूर्णपणे टाळण्याचे आणि गॅसचा प्रभाव पूर्ण संपेपर्यंत योग्य ती खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे असेही स्पष्ट केले आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *