Thane: २९ लाख ठाणेकरांसाठी ठामपाचे फक्त सहा टँकर.. तहानलेले घोडबंदर खासगी टँकर लॉबीला दिले आंदण.. पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांचा आरोप!
ठाणे: पाणीटंचाईच्या काळात २९ लाख ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी ठाणे महापालिकेच्या मालकीचे अवघे सहा टँकर असल्याने घोडबंदर परिसरातील गृहसंकुलांना नाईलाजाने खासगी टँकरपोटी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. विशेष म्हणजे खासगी टँकरची आकडेवारीच महापालिकेकडे नसल्याची बाब उघडकीस आली असून प्रशासनाने त्यांना लूट करण्याची सूट दिल्याचा खळबळजनक आरोप आमदार संजय केळकर यांनी केला नुकत्याच झालेल्या पाहणी दौऱ्यात केला.बुधवारी आमदार संजय केळकर यांनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांचे प्रतिनिधी यांचा संयुक्त पाहणी दौरा घोडबंदर परिसरात केला.
यावेळी मानपाडा येथील हिलक्रिस्ट सोसायटी, एन.जी. रेसिडेंसी, पातलीपाडा हिरानंदानी परिसर, ऋतू इस्टेट, क्लासिक कॉसमॉस, यशस्वीनगर म्हाडा सोसायटी, मरीआई नगर ढोकाळी, वसंत विहार, रजनीश हवामहल, सोसायटी, पिनॅकल सोसायटी आदी परिसरातील रहिवाशांचे प्रतिनिधी पाणी टंचाईचे प्रश्न घेऊन उपस्थित होते. काही गृहसंकुलांना पाच मिनिटे, काहींना तासभर तर काहींना सकाळी किंवा संध्याकाळी अपुऱ्या प्रमाणात पाणी मिळत असल्याच्या तक्रारी करत रहिवाशांनी अधिकाऱ्यांसमोर आक्रोश केला.
त्यांच्या समस्या ऐकून त्यांचे निरसन करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. ज्या-ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत, त्या तातडीने सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला. अनधिकृत नळजोडण्यांमुळे पाणीचोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याने या जोडण्यांवर देखील कारवाई करण्याच्या सूचना श्री.केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या.शहराला ६२५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना सद्यस्थितीत ४० दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता आहे. घोडबंदर परिसराला सध्या किमान १० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याची गरज आहे. मात्र संपूर्ण शहरासाठी ठाणे महापालिकेकडे फक्त सहा पाण्याचे टँकर आहेत.
त्यामुळे खासगी टँकर लॉबीला नागरिकांची लूट करण्यास रान मोकळे मिळाले आहे. विशेष म्हणजे या खासगी टँकरची आकडेवारीच महापालिकेकडे नसल्याने प्रशासन पाणीटंचाईबाबत गंभीर नसून खासगी टँकर लॉबीला पाठीशी घालत असल्याचा आरोप आ.केळकर यांनी केला.अतिरिक्त १० दशलक्ष लिटर पाण्याची कसर भरून काढण्यासाठी कच्चे पाणी घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुरवठा करावा किंवा स्टेम, भातसा किंवा मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ही गरज तातडीने पूर्ण करण्याची मागणी श्री. केळकर यांनी केली. जेणेकरून या भागातील पाण्याचा दाब वाढून रहिवाशांना पुरेसे पाणी मिळेल, अशी मागणी श्री. केळकर यांनी केली.
वाढीव पाणी पुरवठ्याबाबत सातत्याने पाठपुरावा करताना पालकमंत्र्यांकडे देखील मागणी केली आहे. तरीही अद्याप यावर निर्णय होत नसल्याची खंत श्री.केळकर यांनी व्यक्त केली. आता सणावाराचा काळ असल्याने पाणी टंचाईची अधिक झळ नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे लवकरच सर्व विभागांची बैठक घेऊन अतिरीक्त पाण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.यावेळी पाणीपुरवठा विभागाचे उप कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी, अभियंता श्री.शेटे यांच्यासह भाजपचे नगरसेवक विकास पाटील तसेच कैलास म्हात्रे, मंडल अध्यक्ष जितू मढवी, मंडल अध्यक्ष निलेश पाटील, रविराज रेड्डी, भानुदास भोईर, हेमंत म्हात्रे, विनायक पांडे, राजेश जाधव, फरहान सिद्दिकी, मेघनाथ घरत, मंजुळा माळेकर आधी पदाधिकारी आणि रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
