Raj Thackeray: गणपती उत्सवादरम्यान दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो; राज ठाकरेंचा हिंदू-मुस्लिमांना सतर्कतेचा इशारा!
ताज्या बातम्या राजकारण

Raj Thackeray: गणपती उत्सवादरम्यान दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो; राज ठाकरेंचा हिंदू-मुस्लिमांना सतर्कतेचा इशारा!

Sep 6, 2026

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात उत्साहात पार पडला. या मेळाव्याला राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षबांधणीसोबतच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधत नागरिकांना जाती-धर्माच्या वादात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

देशातील बेरोजगारी आणि एकूणच परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत त्यांनी या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी धार्मिक आणि जातीय मुद्दे पुढे आणले जात असल्याचे म्हटले.येत्या १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असताना या काळात दंगली घडवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याची भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात अशा घटना घडवून नागरिकांचे लक्ष इतर महत्त्वाच्या प्रश्नांपासून विचलित केले जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला.मुंबईत अशा प्रकारची एक झलक पाहायला मिळाली असून, ही केवळ सुरुवात असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी समाजातील सुजाण हिंदू आणि सुजाण मुसलमानांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले.“एकमेकांमध्ये भांडणे लावून त्यामध्ये समाजाला गुंतवून ठेवणे, हाच कार्यक्रम सध्या सुरू आहे. यात विनाकारण आपली मुले भरडली जातील आणि आपले लक्षही त्याच मुद्द्यांवर केंद्रित राहील,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.दरम्यान, मनसेकडून सध्या पक्षबांधणीवर भर देण्यात येत असून, गेल्या महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानालाही सुरुवात करण्यात आली होती!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *