Anganwadi nutrition food : अंगणवाडी पोषण आहारात गडबड आढळल्यास खैर नाही…मंत्री आदिती तटकरे यांचा कडक इशारा!
मुंबई/पुणे २५ : पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये लहान बालके आणि गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा तपासण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीत आहाराबाबतचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. सोमवारपासून सुरू झालेली ही मोहीम गुरुवारपर्यंत राबवली जाणार असून, यात सर्व अंगणवाड्यांमधील धान्य, शिजवला जाणारा आहार, त्याची गुणवत्ता आणि स्वच्छता यांची सखोल पाहणी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या मोहिमेबाबत माहिती दिली आहे.
या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोषण आहाराच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशारा दिला आहे. त्यांनी जारी केलेल्या निर्देशांनुसार, सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्थ असलेल्या मुख्यसेविका व पर्यवेक्षिकांनी पुढील ४८ तासांच्या आत आपापल्या क्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन आहाराची बारकाईने तपासणी करावी. तसेच विभागीय आयुक्त, जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनानेही स्वतः अंगणवाड्यांना भेट देऊन आहाराच्या गुणवत्तेची खातरजमा करावी.
तपासणीदरम्यान कोणताही आहार निकृष्ट किंवा खराब आढळल्यास तो संबंधित पुरवठादाराकडून तात्काळ बदलून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. अंगणवाडीत प्राप्त होणारा आहार सुरक्षित आणि योग्य स्थितीत आहे की नाही याची पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले असून निष्काळजीपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे!
