Bjp Minister Nitin Gadkari statement : आता जास्त काम करू शकत नाही… नितीन गडकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!
काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथे एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात केंद्रीय परिवहन आणि रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी बोलत होते. या कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना त्यांनी निरोगी आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. “आपणही दररोज अडीच तास योगासन करतो. विद्यार्थ्यांनीही योगासन केले पाहिजे, जेणेकरून मिळालेले आयुष्य उत्तम जगता येईल. इतरांचे आयुष्य चांगले करण्यासाठी काम करणे हे आपले सामाजिक दायित्व आणि राष्ट्रीय जबाबदारी आहे,” असा सल्ला त्यांनी दिला.आपल्या जीवनशैलीतील बदलांविषयी सांगताना गडकरी म्हणाले की, “पूर्वी पक्षाचे काम करताना समोसा खाऊन झोपायचो, कुठलीही शिस्त नव्हती. मात्र कोरोना काळानंतर जीवनशैलीत बदल केला असून दररोज योगासन करतो. तब्येत चांगली असेल तरच आयुष्याचा आनंद घेता येतो. तब्येत चांगली नसेल तर सत्ता काही कामाची नाही.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी राजकीय भवितव्याबाबत एक मोठे विधान केले. “आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे आणि नव्या पिढीला नवी जबाबदारी दिली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. नितीन गडकरी यांनी नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी हे विधान केले असले, तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
इथेनॉल धोरणामुळे गडकरी अडचणीतदुसऱ्या एका बातमीनुसार, पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण (E20) करण्याच्या धोरणामुळे नितीन गडकरी अडचणीत आले असून त्यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.भारतात E20 (२०% इथेनॉल आणि ८०% पेट्रोल) इंधन मिश्रणाला विरोध होत आहे. विशेषतः २०२३ पूर्वी उत्पादित झालेल्या पेट्रोल वाहनांचे मालक या धोरणामुळे चिंतेत आहेत. या इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी होते, वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढतो आणि इंजिनचे भाग अकाली निकामी होतात, असा दावा वाहनधारकांकडून केला जात आहे!
