Chatrapati Sambhaji nager: छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत, खवड्या डोंगरावरील हृदयद्रावक घटना!
छत्रपती संभाजीनगर २२ : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील तिसगाव येथील खवड्या डोंगरावर एक अत्यंत भयानक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. किरकोळ वादानंतर व्यथित झालेल्या १८ वर्षीय तरुणाने डोंगराच्या कड्यावरून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. ही माहिती मिळताच त्याचे आई-वडील, स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले. शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे तीन तास उपस्थितांनी आणि आईने मुलाची समजूत काढत त्याला मागे फिरण्याची विनंती केली.
मात्र, मुलगा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य पाहून वडिलांनी मुलाला मागून पकडून सुरक्षितपणे मागे ओढण्याचा प्रयत्न केला. पण त्याच क्षणी मुलाचा पाय घसरून तो खाली कोसळला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल गेला. दोघांचाही खोल दरीत कोसळून जागीच मृत्यू झाला.
आपल्या डोळ्यांसमोर पती आणि पोटच्या मुलाचा झालेला भीषण अंत पाहून तीव्र मानसिक आघातातून आई संगीता यांनीही क्षणाचाही विलंब न लावता त्याच डोंगरावरून खाली उडी घेतली. एकाच घरातील तिघांचाही असा करुण अंत झाल्याने संपूर्ण वाळूज परिसर आणि जिल्हा हादरून गेला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत!
