Delhi: ९ हजारांवरून साडेसोळा हजार जवानांसाठी महाराष्ट्राचा ‘रक्तसंकल्प’ दुपटीने बळकट…‘सिंदूर महारक्तदान यात्रेतून राष्ट्रसेवेचा नवा विक्रम; रक्तवीरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सलाम…क्रीडासनेचे प्रमुख डबल हिंदकेसरी चंद्रहार पाटील यांचे शिंदे यांनी केले विशेष कौतुक”अभिमान मराठी अभिजात मराठी” कार्यक्रम उत्साहात संपन्न!
नवी दिल्ली, ता. ९ : गेल्या वर्षी ९ हजार रक्तवीरांनी रक्तदान केले, तर यंदा या राष्ट्रसेवेच्या उपक्रमाला आणखी मोठी झेप मिळाली असून साडेसोळा हजार रक्तवीरांनी रक्तदान करून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘सिंदूर महा रक्तदान यात्रा’च्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांशी रक्ताचे नाते जोडले असून, हा केवळ रक्तदानाचा उपक्रम नसून राष्ट्रभक्ती आणि समाजसेवेचे जिवंत उदाहरण आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.‘अभिमान मराठी, अभिजात मराठी’ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी आयुषमंत्री प्रतापराव जाधव, उद्योगमंत्री उदय सामंत, लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार संदिपान भुमरे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार नागेश अष्टीकर, राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा, माजी आमदार शहाजीबापू पाटील, डबल हिंदकेसरी तथा क्रीडा सेनेचे प्रमुख चंद्रहार पाटील, निवृत्त कर्नल मोहन काप्तिकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गेल्या वर्षी जम्मूतील आर्मी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते आणि पैलवान रक्तदानासाठी पोहोचले होते. यावर्षी तब्बल ४० तासांचा प्रवास करून महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदाते येतील, असे तेथील लष्करी अधिकाऱ्यांनाही वाटले नव्हते. मात्र महाराष्ट्राच्या रक्तवीरांनी हा विक्रम घडवून आणला. गेल्या वर्षी ९ हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. यंदा या संख्येत जवळपास दुपटीची वाढ होत साडेसोळा हजार रक्तवीरांनी रक्तदान केले, ही महाराष्ट्राच्या राष्ट्रभक्तीची ताकद असल्याचे शिंदे यांनी सांगितले.रक्षाबंधनाच्या निमित्ताने जवानांसाठी आयोजित या उपक्रमाची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही दखल घेतली. महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या संख्येने रक्तवीर कसे आले, अशी विचारणा त्यांनी केली असता, ४० तासांचा प्रवास करूनही महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि पैलवान त्याच उत्साहाने रक्तदानासाठी आले असल्याचे आपण सांगितल्याचे शिंदे यांनी नमूद केले.जम्मूच्या प्रवासातील अनुभव सांगताना शिंदे म्हणाले की, हेलिकॉप्टरमधून जात असताना खराब हवामानामुळे पुढे जाण्याबाबत शंका निर्माण झाली होती.
मात्र ‘कोशिश करने वालों की हार नहीं होती, हिम्मत की कीमत है’ या भावनेने प्रवास सुरू ठेवला. पुढे वातावरण सुधारले आणि जम्मूमध्ये पोहोचल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. तरीही इच्छाशक्ती कायम ठेवून जवानांसाठीचा हा संकल्प पूर्ण करण्यात आला. ४० ते ६० तासांचा प्रवास करून रक्तदानासाठी पोहोचणे सोपे नाही; पण इच्छाशक्ती असेल तर अनंत अडचणींवर मात करता येते, असे शिंदे म्हणाले.बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा मूलमंत्र आजही शिवसेनेच्या कामाचा आधार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा समाजसेवेतून पुढे नेला जात आहे. ‘सिंदूर महा रक्तदान यात्रा’ हे त्याचे ज्वलंत उदाहरण असून, शिवसेना समाजसेवा कशा पद्धतीने करते, हे संपूर्ण देशाने या उपक्रमातून पाहिले आहे, असे शिंदे म्हणाले.‘मला काय मिळाले?’ यापेक्षा ‘समाजाला काय मिळाले?’ हा विचार करून काम केले पाहिजे.
पैसा, प्रॉपर्टी किंवा संपत्ती किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली हे महत्त्वाचे आहे. माणसांचे प्रेम हीच आपली ताकद, आपले वैभव आणि शिवसेनेचे ऐश्वर्य आहे, असे शिंदे यांनी सांगितले.सिंदूरचा रंग आणि रक्ताचा रंग एकच असून, हा रंग देशासाठी रक्त सांडलेल्या जवानांच्या बलिदानाचा आणि रक्तदान करणाऱ्या रक्तवीरांच्या सेवाभावाचा आहे. कुस्ती ताकद शिकवते, तर रक्तदान संवेदना शिकवते. रक्त कारखान्यात तयार होत नाही; रक्तदानातूनच एखाद्याला जीवनदान देता येते. एका रक्तदानातून तीन जणांचे प्राण वाचवता येतात. सीमेवर प्रत्यक्ष लढायला गेले नसले तरी जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तवीराचे योगदान अत्यंत मोठे आहे, असे शिंदे म्हणाले.चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली तरुण आणि पैलवान मोठ्या संख्येने रक्तदानासाठी सहभागी होत असल्याचे कौतुक करताना शिंदे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. ‘पैलवानांच्या गळ्यातला सोन्याचा हार म्हणजे चंद्रहार आणि देशसेवेचा अंगार म्हणजे आपला चंद्रहार,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले.शेतकरी हा देशाचा अन्नदाता आणि मायबाप असून सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.
मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या मदतीसोबत महाराष्ट्र सरकारनेही आर्थिक मदत केली, एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली आणि नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेतले, असे त्यांनी सांगितले.ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई करत भारतीय लष्कराची ताकद जगाला दाखवून दिली. आपल्या आया-बहिणींच्या कुंकवाला धक्का देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना घरात घुसून उत्तर देण्याची ताकद भारतीय सैन्याने दाखवली, असे शिंदे म्हणाले.ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची भूमिका जगभर पोहोचवण्यासाठी विविध देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळे पाठवण्यात आली. त्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचाही सहभाग होता.
आज रक्तदानाच्या माध्यमातून जवानांशी रक्ताचे नाते जोडले जात आहे. बाळासाहेब ठाकरे आज असते तर जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या आपल्या रक्तवीरांचा त्यांना निश्चितच अभिमान वाटला असता, असे शिंदे म्हणाले.कोणत्याही देशाची खरी ताकद केवळ त्याच्या शस्त्रांमध्ये नसते, तर जनतेच्या एकजुटीत आणि देशभक्तीत असते. ‘सिंदूर महा रक्तदान यात्रा’ ही महाराष्ट्राच्या याच राष्ट्रभक्तीची आणि राष्ट्रीय एकजुटीची निशाणी आहे, असे सांगत शिंदे यांनी सर्व रक्तवीरांचे मनापासून आभार मानले.‘मिट्टी की सौगंध है, तिरंगा कमाल है; सैन्य का सम्मान ही भारत की पहचान है. जो देश के काम आए, वही महान है. नमन करें उस सच्चे हिंदुस्तान को,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला!
