Eknath shinde: मुंबईत रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी…मुंबई-सावंतवाडी रेल्वे कोकणवासीयांच्या श्रद्धेला, आठवणींना आणि विकासाला नवा वेग देणारी जीवनवाहिनी; मुंबई-सावंतवाडी विशेष रेल्वे सेवेचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ऑनलाइन उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ!
मुंबई, ता. ३ : रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने मिळून सोडवावा अशी आग्रही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई-सावंतवाडी विशेष रेल्वे सेवेचा शुभारंभ गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गाडीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. रेल्वेमंत्री वैष्णव दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी ही मागणी केली.यावेळी बोलताना, कोकण आणि मुंबईचे नाते पिढ्यान् पिढ्यांचे असून कोकणी माणसाची जन्मभूमी कोकण आणि कर्मभूमी मुंबई आहे.
या जन्मभूमी आणि कर्मभूमीला जोडणारी मुंबई-सावंतवाडी रेल्वे म्हणजे कोकणवासीयांची मनं जोडणारी जीवनवाहिनी आहे. ही रेल्वे हजारो कोकणवासीयांच्या श्रद्धेला, आठवणींना आणि कोकणाशी असलेल्या अतूट नात्याला नवा वेग देणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या सेवेचे महत्त्व सांगताना शिंदे म्हणाले की, गणरायाची आरती, गावकीतील आपुलकी आणि गावच्या मातीचा सुगंध यामुळे कोकणी माणूस मनाने आधीच गावाला पोहोचलेला असतो. त्यामुळे कोकणचा प्रवास हा केवळ अंतराचा नसून आपल्या मुळांकडे जाणारा भावूक आणि भक्तिमय प्रवास आहे.
कोकणची भौगोलिक परिस्थिती कठीण असतानाही कोकण रेल्वेच्या ७०१.७ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल शिंदे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे कौतुक केले. यामुळे प्रदूषणमुक्त प्रवासासह रेल्वेगाड्यांच्या वेगातही वाढ झाली आहे. कोकण मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करून पर्यटन आणि विकासाला नवी पंख देण्यात आली आहेत.जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील जगातील सर्वाधिक उंच रेल्वे पूल हा भारताच्या अभियांत्रिकी सामर्थ्याचा अभिमान असून काश्मीरला रेल्वेने जोडण्याचे असंभव वाटणारे स्वप्न साकार करून इतिहास घडवण्यात आला आहे. देशातील १३०० हून अधिक रेल्वे स्थानकांना अत्याधुनिक सुविधा देण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कनेक्टिव्हिटी वाढली की रोजगार, व्यापार आणि पर्यटन वाढते आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते. त्यामुळे मुंबई-सावंतवाडी थेट रेल्वेचा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणाला मोठा लाभ होईल. निसर्गरम्य डोंगररांगा, किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, आंबा-काजूच्या बागांमुळे कोकणात पर्यटनाची अफाट क्षमता असून सुलभ कनेक्टिव्हिटीमुळे त्याला मोठी चालना मिळेल. पर्यटन मंत्री आणि नितेश राणे यांचे पर्यटनवाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातून १० वंदे भारत गाड्या धावत असून बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रासाठी रेल्वे व पायाभूत सुविधांना केंद्राने २३ हजार ९२६ कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
अश्विनी वैष्णव हे सकारात्मक आणि प्रॅक्टिकल मंत्री असून काम कसे होईल याचा मार्ग ते शोधतात, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला. रेल्वे आणि महाराष्ट्र सरकारने संयुक्तपणे हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांना घरे आणि रेल्वेला विकासासाठी जागा मिळेल, अशा पद्धतीने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मुंबई-सावंतवाडी रेल्वे ही कोकणच्या विकासाला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत शिंदे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मत्स्यविकास मंत्री नीलेश राणे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर राजीव श्रीवास्तव आणि इतर सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते!
