Gen z – जेन-झी विद्यार्थ्यांसाठी मुंबई लोकलमध्ये ३ डबे आरक्षित करण्याची मागणी; तेजस्वी घोसाळकर यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र!
मुंबई दिल्लीच्या जंतर-मंतरवर जेन-झी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले होते.विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारवरही दबाव निर्माण झाला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली होती. भारतात जेन-झी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आता या आंदोलनामुळे निर्माण झालेली नाराजी दूर करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील तरुणांशी संवाद साधताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रात्री इन्स्टाग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. आता भाजप नेतेही जेन-झींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी जेन-झी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची मागणी केली आहे.
कॉलेजला जाणाऱ्या जेन-झी आणि जेन-अल्फा पिढीसाठी मुंबई लोकलमधील १२ डब्यांपैकी ३ डबे आरक्षित करण्यात यावेत, अशी मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी केली आहे. हे डबे पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत आरक्षित ठेवण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यासंदर्भात तेजस्वी घोसाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले असून, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन डबे आरक्षित करण्याची मागणी केली आहे. आता या मागणीवर रेल्वे मंत्रालय आणि सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे!
